सर्वोच्च न्यायालय करणार निर्णयावर पुनर्विचार
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
दिल्लीच्या राजधानी क्षेत्रातील सर्व भटक्या श्वानांना बंदिस्त आसरागृहांमध्ये आठ आठवड्यांच्या आत नेण्यात यावे, या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा पुनर्विचार तीन न्यायाधीशांच्या पीठाकडून केला जाणार आहे. सरन्यायाधीश भूषण रामकृष्ण गवई यांनी यासंबंधी बुधवारी सकाळी टिप्पणी केली होती. न्यायालय या आदेशाचा पुनर्विचार करू शकेल, असा संकेत त्यांनी दिला होता. आज गुरुवारी यासंबंधी नव्या पीठासमोर सुनावणी होणार असून आदेशाला अंतरिम स्थगिती मिळू शकते. सर्वोच्च न्यायालयात भटक्या कुत्र्यांसंबंधात एक याचिका 2024 मध्ये सादर करण्यात आली होती.
दिल्लीचे नागरी प्रशासन भटक्या कुत्र्यांच्या नसबंदीविषयी उदासीन आहे. कुत्र्यांची नसबंदी वेळेवर केली न गेल्याने त्यांची संख्या वाढत राहते. यामुळे कुत्र्यांनी नागरिकांना चावा घेण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. दिल्ली प्रशासनाला योग्य तो आदेश देण्यात यावा, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली होती. ही याचिका सरन्यायाधीश गवई यांच्यासमोर बुधवारी सुनावणीला आली. सुनावणी प्रसंगी या संबंधात सर्वोच्च न्यायालयानेच दिलेल्या नव्या निर्णयाचा संदर्भ देण्यात आला. हा निर्णय आक्षेपार्ह असल्याचे काही जणांचे मत आहे. ते सरन्यायाधीशांच्या कानावर घालण्यात आले. त्यानंतर त्यांनी या संबंधात आम्ही विचार करू असे स्पष्ट केले. त्यानुसार आता नव्या पीठाची स्थापना करण्यात आली आहे. सुनावणीही त्वरित केली जाणार आहे.
नवा आदेश काय आहे…
गेल्या सोमवारी न्या. जे. बी. परडीवाला आणि न्या. आर. महादेवन यांनी या संदर्भात आदेश दिला होता. दिल्लीच्या राजधानी क्षेत्रात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढत असून तो दूर करण्यासाठी त्वरित कृती करण्याची आवश्यकता आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले होते. या खंडपीठाने श्वानांच्या उपद्रवाची स्वत:हून नोंद घेऊन हा आदेश दिला होता. कुत्र्यांनी चावा घेण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे दिल्लीत अनेक बालकांना रॅबिज हा जीवघेणा रोग झाल्याच्या वृत्तांची नोंद घेत न्यायालयाने हा आदेश दिला होता. तथापि, त्यानंतर त्वरित देशभरातील अनेक श्वानप्रेमींनी या निर्णयाविरोधात आक्षेप घेतला. भटक्या कुत्र्यांना बंदिस्त करणे मानवताविरोधी आहे, असा मुद्दा उपस्थित करण्यात आला. त्याचप्रमाणे दिल्लीत आठ लाख भटके श्वान आहेत. त्या सर्वांची व्यवस्था आसरागृहांमध्ये योग्य रितीने करता येणे शक्य नाही, असाही मुद्दा मांडण्यात आला. काही राजकीय नेत्यांनीही या निर्णयाविरोधात प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यामुळे आता या निर्णयावर पुनर्विचार करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला आहे.
सुवर्णमध्य काढण्याचा प्रयत्न होणार…
भटक्या कुत्र्यांचा प्रश्न गंभीर असून त्यांच्यापासून नागरिकांना धोका आहे, ही बाब स्पष्ट आहे. त्याचप्रमाणे श्वान हे जीव असल्याने त्यांच्यासंबंधी कठोर निर्णय घेणे भूतदयेच्या तत्वाच्या विरोधी होणार आहे, असे अनेकांचे म्हणणे आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय पुनर्विचार करताना सुवर्णमध्य काढण्याचा प्रयत्न करेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. यासंबंधीचे चित्र आज गुरुवाही स्पष्ट होईल.









