सर्वोच्च न्यायालयात घटनापीठासमोर युक्तिवाद
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
राजकीय पक्षांना निधी देण्यासाठी निवडणूक बाँड योजनेच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर मंगळवारपासून सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर महत्त्वपूर्ण सुनावणी सुरू होणार आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती संजीव खन्ना, न्यायमूर्ती भूषण रामचंद्र गवई, न्यायमूर्ती जे. बी. पारदीवाला आणि मनोज मिश्रा यांचा समावेश असलेले खंडपीठ काँग्रेस नेत्या जया ठाकूर आणि भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी) यांनी दाखल केलेल्या याचिकांसह चार याचिकांवर सुनावणी घेणार आहे. या सुनावणीच्या अगोदर, अॅटर्नी जनरल आर वेंकटरामणी यांनी न्यायालयासमोर दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात सर्वसामान्य नागरिकांना राजकीय पक्षांच्या निधीच्या स्त्राsताबाबत घटनेच्या कलम 19(1)(अ) नुसार माहिती मिळवण्याचा अधिकार नाही, असे स्पष्ट केले आहे.
2 जानेवारी 2018 रोजी सरकारने अधिसूचित केलेली निवडणूक रोखे योजना राजकीय पक्षांना निधीमध्ये पारदर्शकता आणण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून रोख देणग्यांचा पर्याय म्हणून तयार करण्यात आली होती. निवडणूक रोखे योजनेच्या तरतुदींनुसार, भारतातील कोणताही नागरिक किंवा भारतात समाविष्ट किंवा स्थापित केलेल्या घटकाद्वारे निवडणूक रोखे खरेदी केले जाऊ शकतात. एखादी व्यक्ती एकट्याने किंवा इतर व्यक्तींसोबत एकत्रितपणे निवडणूक रोखे खरेदी करू शकते.
अॅटर्नी जनरल यांचे मत
अॅटर्नी जनरल आर वेंकटरामणी यांनी रविवारी राजकीय पक्षांना निवडणूक रोख्यांच्या अंतर्गत मिळालेल्या देणग्या सार्वजनिक करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर आपले मत व्यक्त केले. या निधीचा स्रोत जाणून घेण्याचा मूलभूत अधिकार राज्यघटनेने नागरिकांना दिलेला नाही, असे त्यांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितले. इलेक्टोरल बाँड्सचे नियमन करण्यासाठी पॉलिसी डोमेनमध्ये प्रवेश करू नका, असा इशाराही त्यांनी दिला.
काँग्रेस-भाजपचे आरोप-प्रत्यारोप
या मुद्द्यावरून काँग्रेस नेते पी चिदंबरम यांनी भाजपवर निशाणा साधला. ‘एक्स’ वर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी भाजप मोठ्या कॉर्पोरेट्सकडून गुपचूप, चुकीच्या पद्धतीने आणि षड्यंत्राचा भाग म्हणून पैसा मिळवते, असा दावा त्यांनी केला. चिदंबरम यांच्या विधानाला विरोध करताना भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी काँग्रेस अधिक पारदर्शक आणि लोकशाही राजकीय निधी व्यवस्था लागू करण्याच्या प्रयत्नांना विरोध करते, असे म्हटले आहे.









