श्रवण कसं करावं? का करावं? हे चिंतन करत असताना दोन कथा प्रकर्षाने आठवल्या. श्रीमद्भागवत वाचत असताना पहिल्या भागात आलेली गोकर्णाची कथा. एकाच घरात जन्माला आलेली दोन मुलं पण पूर्वकर्मामुळे वेगवेगळ्या मार्गाला लागतात. धुंदुकारीच्या पापांमुळे. त्याला सद्गती न मिळाल्याने गोकर्णाला भागवत कथेचं वाचन करावं लागतं. कृष्णलीलेच्या रूपात भागवत पारायण श्रवण करताना काया, वाच्या, मनाने, कसं करायचं याचं एक उत्तम उदाहरणच धुंदूकारीच्या रूपात आपल्याला मिळतं. या उत्तम श्रवणाचे फळ वाचताना तहानभूक विसरून एक चित्ताने फक्त भगवंताचे श्रवण जो करतो तो परब्रम्हाला भेटू शकतो. ही अनुभूती या कथेमध्ये आपल्याला मिळते.
तर दुसरी एक कथा एकनाथांच्या घरी फक्त जेवायला येताना दिसणारा गावबा त्यांच्या कीर्तनाचे उत्तम श्रवण करीत होता. भक्ती योगाच्या मार्गाला जात होता, याचं उदाहरण म्हणजे हा गावबा. तो कीर्तन ऐकताना डोळे मिटून बसत असल्याने सगळ्या लोकांना वाटायचं की हा जेवून झोपतो किंवा जेवणासाठी वाट बघत बसतो. गावबा कानाने ऐकत असताना एकचित्ताने श्रवण करायचा. त्याची भगवत चिंतनातली एकरूपता इतकी मोठी झाली की तो एकनाथांचा उत्तराधिकारी ठरला आणि त्यांचं राहिलेलं रामायणाचे लेखन त्याने पूर्ण केले. असं हे श्रवण. हे श्रवण अध्यात्माच्या क्षेत्रात खूप वेगळ्या अंगानं सुरू असतं. गुरु शिष्य समोरासमोर बसले तरी शब्दाशिवाय संवाद साधतात. असाच एक अनुभव आपल्या लेखिका शांता शेळके यांना आला. एका परदेशी लेखकाच्या समोर बसल्यानंतर दोघांनाही एकमेकांची भाषा येत नसली तरी त्यांच्यामध्ये उत्तम संवाद झाला असं त्या लिहितात. पारशी लोक गुजरातच्या सीमेवर आल्यावर असा संवाद तिथल्या राजाशी झाला होता. पारशी लोकांचा प्रमुख या राजाकडे आला. राजाने या प्रमुखाच्या समोर दुधाचा ग्लास नेला. पारशी लोकांच्या गटप्रमुखाने आपल्या खिशातील साखर या दुधात टाकली आणि राजाला परत दिले. या सगळ्या कृतीचा अर्थ असा होता, की आम्ही या तुमच्या राज्यात राहताना दुधात साखर मिसळल्यासारखे राहून बोलता झालेला हा संवाद एक वेगळंच श्रवण घडवून जातो.
अध्यात्माच्या या श्रावणात एका विशिष्ट नादाला प्रमुख स्थान असतं जो योग्यांना किंवा विशिष्ट योगावस्थेला आलेल्या व्यक्तीला जाणवू शकतो. त्याला अनाहत नाद असं म्हणतात. आपण एरवी ऐकतो तो आहत नाद. वेगवेगळ्या आघातांमुळे निर्माण झालेला असतो. दोन ओठांमधून बाहेर पडलेला शब्द अनेक ठिकाणी आपटून मगच बाहेर येत असतो. ढोल बँड वाजल्यावरती ध्वनी कानावर पडतो किंवा एखादं वाद्य वाजल्यावर आपल्याला ते ऐकायला येतात असे कितीतरी आवाज आपण नादाच्या या यादीमध्ये आणतो. निसर्गातले आवाजसुद्धा या नादाचाच एक प्रकार. या नादाला आहत नाद असं म्हणतात. वाऱ्याची सळसळ, पक्षांचे आवाज, पाण्याची खळखळ हे सगळे कशावर तरी आपटल्यानंतरच आपल्याला ऐकू येतात पण अनाहत नाद मात्र कमालीच्या शांततेच्या ठिकाणीच अनुभवायला मिळतो आणि म्हणूनच आपण अनेकदा या अनाहत नादाच्या ओढीनेच निसर्गाच्या ठिकाणी भ्रमंतीला जात असतो. या ठिकाणी तुम्हाला तुमच्या मनाची एकाग्रता झाली की आपल्याच हृदयाचे ठोके, रक्ताचे प्रवाह, जाणवायला लागतात. आपण कुठेतरी ह्या मार्गातून अनाहत नादाच्या जवळ जायला लागलेले असतो.








