पणजी /प्रतिनिधी
सभापती रमेश तवडकर यांनी उद्या सोमवार 13 रोजी अपात्रतेच्या दोन याचिकांवर सुनावणी निश्चित केली आहे. यातील पहिली सुनावणी दुपारी 12 वाजता होणार असून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर विऊद्ध दिगंबर कामत आणि मायकल लोबो अशी असून दुसरी डॉम्निक नरोन्हा यांनी सादर केलेल्या याचिकेवर सुनावणी दुपारी 12. 30 वाजता होणार आहे. यामध्ये दिगंबर कामत आणि इतर सातजण आमदार जे यापूर्वीच काँग्रेसमधून थेट भाजपामध्ये सामील झाले होते, त्यांना अपात्र करावे यासाठीची आहे. अपात्रता प्रकरणी आठ आमदारांच्या विरोधात गिरीश चोडणकर आणि अमित पाटकर यांनी दोन स्वतंत्र याचिका सादर केलेल्या आहेत. सदर याचिकांवर अद्याप सुनावणी निश्चित केलेली नाही व त्यासंदर्भात सभापतींनी आमदारांना नोटिसादेखील पाठवलेल्या नाहीत, मात्र डॉम्निक नरोन्हा यांनी सादर केलेली याचिका सभापतांनी दाखल करून घेतलेली आहे. या याचिकेवर उद्या 13 रोजी सुनावणी होणार आहे.









