प्रतिनिधी,कोल्हापूर
Rajaram Sugar Factory Election 2023 : छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी दाखल केलेले उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्याच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांच्या दालनात मंगळवारी सुनावणी होणार आहे.आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी छत्रपती शाहु परिवर्तन आघाडीच्या 29 उमेदवारांनी याबाबत अपील केले होते.
राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची सन 2023 ते 2028 या कालावधीसाठीची निवडणूक प्रक्रिया सध्या सुरु आहे.या निवडणुकीसाठी राजर्षी छत्रपती शाहु परिवर्तन आघाडीच्यावतीने निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दाखल केलेल्या उमेदवारी अर्जावर सत्ताधारी गटाकडून हरकती दाखल करण्यात आल्या होत्या.छाननी प्रक्रियेदरम्यान या हरकती मान्य करुन निवडणूक निर्णय अधिकारी यांनी 28 मार्च रोजी 29 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरवले होते.या विरोधात आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली उमेदवारांनी 31 मार्च रोजी प्रादेशिक साखर सहसंचालक ए.व्ही.गाडे यांची भेट घेऊन अपील दाखल केले होते. उमेदवारीसाठी पात्र असलेबाबतचे तब्बल 1 लाख 30 हजार पानांचे पुरावे यावेळी सादर करून उमेदवारी आर्ज आपात्रतेचा निर्णय रद्द करण्याची मागणी त्यानी केली होती.
महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 152 (अ) अन्वये दाखल केलेले हे अपिल मुदतीत दाखल झाले असून त्यावर मंगळवार 4 एप्रिल रोजी सुनावणी घेण्याचे साखर सहसंचालकांनी निश्चित केले आहे. दुपारी 2 वाजता होणाऱ्या या सुनावणीसाठी व्यक्तीश: अथवा वकीलामार्फत आपले लेखी व तोंडी म्हणणे सादर करावे, अशा सूचना प्रादेशिक सहसंचालक (साखर) ए.व्ही.गाडे यांनी दिल्या आहेत.









