काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांची याचिका
पणजी : काँग्रेसचे गोवा प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी आमदार दिगंबर कामत आणि आमदार मायकल लोबो यांच्या विरोधात दाखल केलेली अपात्रता याचिका 26 जून रोजी सायंकाळी 5.30 वाजता सभापती रमेश तवडकर यांच्यासमोर सुनावणीस येणार आहे. जुलै 2022 मध्ये सभापती रमेश तवडकर यांच्यासमोर दाखल केलेल्या याचिकेत त्यावेळी काँग्रेसचे आमदार असलेले कामत आणि लोबो यांच्यावर काँग्रेसचे दोन तृतीयांश आमदार फोडण्यासाठी भाजपसोबत काम केल्याचा आरोप काँग्रेस पक्षाने केला होता. याचिका दाखल करताना काँग्रेसने 2020 च्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे लक्ष वेधले होते. ज्यामध्ये म्हटले होते की, पक्षविरोधी कृती म्हणजे स्वेच्छेने पक्षाचे सदस्यत्व सोडणे होय. कामत आणि लोबो आणि इतर 6 काँग्रेस आमदारांनी अखेरीस सप्टेंबर 2022 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता.
अपात्रता याचिका आमदारच दाखल करु शकतो
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पाटकर यांनी आमदार कामत आणि लोबो यांच्याविरोधात पक्षविरोधी कारवाया केल्याचा दावा करून या दोघांच्याही विरोधात सभापती रमेश तवडकर यांच्याकडे अपात्रता याचिका दाखल केली होती. त्यानंतर लोबो व कामत यांनी या याचिकेला आक्षेप घेत, ‘अपात्रता नियम 1986’नुसार एका आमदाराच्या विरोधात केवळ दुसरा आमदारच अपात्रता याचिका दाखल करू शकतो’ त्यामुळे पाटकर यांची याचिका फेटाळावी, अशी मागणी सभापती तवडकर यांच्याकडे केली होती.
सामान्य नागरिकही याचिका दाखल करु शकतो
परंतु एखाद्या आमदाराच्या विरोधात सामान्य व्यक्तीही अपात्रता याचिका दाखल करू शकते, असे निरीक्षण सभापती तवडकर यांनी नोंदवून कामत आणि लोबो यांची मागणी फेटाळून लावली आहे. याचिकेवर गुणवत्तेनुसार सुनावणी होईल, असे सभापती तवडकर यांनी स्पष्ट केल्याने 26 जून रोजी होणाऱ्या सुनावणाकडे लक्ष लागून राहिले आहे. 26 जून रोजी संध्याकाळी 5.30 वाजता कामत व लोबो यांच्याविरोधातील याचिकेवर सुनावणी घेणार असल्याचे सभापतींनी स्पष्ट केले आहे. सभापती तवडकर यांच्याकडे लोबो व कामत यांच्याविऊद्धची याचिका 26 रोजी सुनावणीस येण्यासंबंधीच्या नोटिसा विधानसभा सचिव नम्रता उल्मन यांनी काल सोमवारी जारी केल्या आहेत.









