प्रतिनिधी/ बेळगाव
सीजीएसटी भरताना 23.82 कोटीच्या भ्रष्टाचार प्रकरणातील संशयित आरोपीने न्यायालयात जामीनसाठी अर्ज दाखल केला आहे. त्या अर्जावर केंद्रीय सेवा कर व उत्पादन शुल्क विभागाचे सरकारी वकील अॅड. मुरगेश मरडी यांनी आपले म्हणणे मांडले असून त्यावर सोमवार दि. 15 रोजी सुनावणी होणार आहे.
बेळगावसह संपूर्ण राज्यात खळबळ उडवून दिलेल्या या जीएसटी प्रकरणातील संशयित आरोपी नकीब नजीब मुल्ला (वय 25 रा. पाचवा क्रॉस आझमनगर) याला न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. 132 कोटीच्या जीएसटीमध्ये त्यांनी गोलमाल करत बनावट बिलाद्वारे 23.82 कोटी परस्पर लाटले आहेत. या प्रकरणाची गंभीर दखल बेळगाव येथील केंद्रीय सेवा कर व उत्पादन शुल्क विभागाने घेतली होती. याचबरोबर या प्रकरणाचा पदार्फाश केला.
नकीब हा आयकर सल्लागार, तसेच फेडरल लॉजिस्टीक अॅण्ड कंपनीचा संचालक असून तो अनेकांचे जीएसटी व आयटी रिर्टन्सचे काम करत होता. यातूनच त्याने बनावट बिलाद्वारे मोठा घोटाळा केल्याचे उघडकीस आले. बुधवार दि. 10 रोजी याप्रकरणी ताब्यात घेऊन जेएमएफसी द्वितीय न्यायालयात हजर केले असता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
संशयित आरोपीने जामीन मिळावा यासाठी न्यायालयाकडे अर्ज दाखल केला. त्यावर उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने अॅड. मुरगेश मरडी यांनी आपली हरकत नोंदवली आहे. सोमवारी त्यावर सुनावणी होणार असल्याने त्याकडे साऱ्यांचेच लक्ष लागून आहे.









