वृत्तसंस्था /नवी दिल्ली
तामिळनाडूचे मंत्री व्ही सेंथिल बालाजी आणि त्यांची पत्नी मेगाला यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने सहमती दर्शवली आहे. शुक्रवार, 21 जुलै रोजी या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालय (ईडी) बालाजीच्या कोठडीला परवानगी देण्याच्या मद्रास उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देत मंत्री बालाजीच्या पत्नीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यांच्या अर्जावर गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती पी. एस. नरसिंह आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी वरिष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद करताना हा मुद्दा तातडीने हाती घेतला नाही तर तो निष्फळ होईल, असा दावा केला. मात्र, सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी ईडीतर्फे हजर राहून सिब्बल यांच्या याचिकेला तातडीची सुनावणी घेण्यास विरोध दर्शवला. तरीही खंडपीठाने शुक्रवारीच याप्रकरणी युक्तिवाद ऐकून घेण्याची तयारी दर्शवली आहे. मंत्री व्ही सेंथिल बालाजी आणि त्यांच्या पत्नीने सर्वोच्च न्यायालयात दोन स्वतंत्र याचिका दाखल केल्या आहेत. त्यावर शुक्रवारच्या सुनावणीतच विचार केला जाणार आहे.









