वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
काँग्रेस नेते राहुल गांधींच्या नवीन पासपोर्टशी संबंधित याचिकेवर बुधवारी दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू न्यायालयात सुनावणी झाली. या प्रकरणाची पुढील सुनावणी शुक्रवारी म्हणजेच 26 मे रोजी होणार आहे. राहुल गांधी यांनी खासदारपद रद्द झाल्यानंतर आपला डिप्लोमॅटिक पासपोर्ट सरेंडर केला होता. यानंतर त्यांनी सामान्य पासपोर्टसाठी एनओसी देण्याची विनंती केली आहे.
नवीन पासपोर्टसाठी ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) देण्याची मागणी करत राहुल गांधी यांनी मंगळवारी याचिका दाखल केली होती. बुधवारी झालेल्या सुनावणीदरम्यान भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी त्यांच्या मागणीला विरोध केला. राहुल गांधींना परदेशात जाण्याची परवानगी दिल्यास नॅशनल हेरॉल्ड प्रकरणाच्या तपासावर परिणाम होऊ शकतो, असे स्वामी यांनी न्यायालयाला सांगितले. याप्रकरणी स्वामी यांनी राहुल आणि सोनिया गांधी यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. यावर अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी वैभव मेहता यांनी स्वामी यांना राहुल यांच्या याचिकेवर उत्तर दाखल करण्यास सांगितले.
राहुल गांधी यांच्याविरुद्ध कोणतीही फौजदारी कारवाई प्रलंबित नाही आणि प्रवास करणे हा त्यांचा मुलभूत अधिकार आहे. नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात न्यायालयाने राहुल यांना 2015 मध्ये जामीन मंजूर केला होता. त्यानंतर न्यायालयाने त्यांच्या प्रवासावर कोणतेही बंधन घातले नाही. 2018 पासून हे प्रकरण प्रलंबित असून यादरम्यान राहुल गांधी अनेकवेळा परदेशात गेले आहेत, असे सुनावणीदरम्यान राहुल गांधींच्या वकिलाने न्यायालयाला सांगितले.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांना 28 मे रोजी अमेरिकेला जायचे आहे. या दौऱ्यात ते स्टॅनफोर्ड विद्यापीठातील एका कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. तसेच 29-30 मे रोजी ते अनिवासी भारतीयांना भेटणार आहेत.









