पणजी : म्हादई वन्यजीवन अभयारण्याला व्याघ्रक्षेत्र घोषित करावे या गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देण्यात आलेल्या सर्वोच्च न्यायालयातील याचिकेवर आज सोमवारी दि. 8 रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे. गोवा राज्य सरकारने त्या आदेशाला आव्हान दिले आहे. प्राप्त माहितीनुसार 24 जुलै 2023 रोजी उच्च न्यायालयाने म्हादई अभयारण्य व्याघ्रक्षेत्र राखीव म्हणून जाहीर करण्याचा आदेश गोवा सरकारला दिला होता. तो आदेश मान्य नसल्याने गोवा सरकारने त्यास आव्हान दिले. तीन महिन्यात ते करावे असेही उच्च न्यायालयाने बजावले होते. तसेच त्याचा आराखडा सादर करावा, अशी सूचनाही न्यायालयाने केली होती.
गोवा सरकारने त्या आदेशाला न जुमानता काहीच केले नाही, उलट त्यास आव्हान देण्याचे जाहीर करून तशी याचिकाही सर्वोच्च न्यायालयात सादर केली. त्यावर आता खूप दिवसांनी म्हणजे आज सोमवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे. गोवा सरकारने म्हादई अभयारण्य व्याघ्रक्षेत्र करण्यात नकार दर्शविला असून त्या दृष्टीने कोणतीच पावले उचलेली नाहीत. त्यामुळे सदर अभयारण्य व्याघ्रक्षेत्र करण्यास सरकार इच्छुक नाही, असे स्पष्ट झाले आहे. आता त्याबाबतचा निकाल आणि निर्णय सर्वोच्च न्यायालयातील सुनवाणीवर अवलंबून आहे. आपली बाजू मांडण्यासाठी गोवा सरकारने चांगल्या वकिलांची नेमणूक केली आहे.









