तामिळनाडू सरकारची याचिका
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला तामिळनाडूत रॅली आयोजिन करण्याची अनुमती देण्याच्या मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या विरोधात तामिळनाडू सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तामिळनाडू सरकारच्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयात बुधवारी सहमती दर्शविली आहे. सशक्त लोकशाहीसाठी अशाप्रकारच्या रॅली आवश्यक असल्याचे म्हणत मद्रास उच्च न्यायालयाने संघाला पूर्वनियोजित दिनी तामिळनाडूत स्वतःची रॅली आयोजित करण्याची अनुमती दिली होती. संघाच्या रॅलीमुळे कायदा-सुव्यवस्थेची समस्या निर्माण होणार असल्याचा दावा राज्य सरकारकडून करण्यात आला आहे. घटनेचे कलम 19 (2) अंतर्गत जनहिताकरता नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि सभा आयोजित करण्याच्या मूलभूत अधिकारांवर बंदी घालता येत असल्याचेही राज्य सरकारने म्हटले आहे.
मागील वर्षी 2 ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने एक रॅली आयोजित करण्याची घोषणा केली होती. ज्यानंतर तामिळनाडू सरकारने संघाला ही रॅली आयोजित करण्याची अनुमती देण्यास नकार दिला होता. यानंतर संघाने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. आता हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे.









