निकालाबाबत अनेक प्रश्न निर्माण ः कर्नाटकसह देशाचे निर्णयाकडे लक्ष
प्रतिनिधी/ बेंगळूर
शाळा आणि महाविद्यालयांमध्ये हिजाब परिधान करण्यावर बंदी घालणाऱया कर्नाटक सरकारच्या आदेशाला उचलून धरलेल्या उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी होणार आहे. या सुनावणीमध्ये खटल्याच्या शेवटी सर्वोच्च न्यायालय कोणाच्या बाजूने निकाल देणार? राज्य सरकारला झटका बसणार का?, याचिककर्त्यांना धक्का बसणार का? अशा पद्धतीचे प्रश्न निर्माण झाले आहेत.
न्यायमूर्ती हेमंत गुप्ता यांच्या नेतृत्त्वाखालील द्विसदस्यीय खंडपीठ आणि न्यायमूर्ती सुधांशू धुलिया यांचा समावेश असलेल्या खंडपीठासमोर सोमवार, 29 ऑगस्ट रोजी शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब घालण्यावर बंदी कायम ठेवणाऱया कर्नाटक उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधातील याचिकांवर सुनावणी होणार आहे. सरकारच्या धोरणामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास हिरावला जात असून त्यांच्या अभ्यासात अडथळा निर्माण होतो आणि विनाकारण कायदा व सुव्यवस्था बिघडते, असा दावा या याचिकांमध्ये करण्यात आला आहे.
उच्च न्यायालयाचा निकाल विद्यार्थ्यांचे मन समजून घेण्यात अयशस्वी ठरतो. परिस्थितीचे गांभीर्यही समजून घेण्यात आलेले नाही, असे याचिकाकर्त्यांनी म्हटले आहे. 15 मार्च रोजी उच्च न्यायालयाने मुस्लीम विद्यार्थिनींच्या एका गटाने हिजाब परिधान करून प्रवेश नाकारल्याबद्दल दाखल केलेली याचिका फेटाळून लावली होती. हिजाबची प्रथा इस्लामच्या अंतर्गत अनिवार्य प्रथा नाही आणि म्हणून ती भारतीय राज्यघटनेच्या कलम 25 अंतर्गत येत नाही, असा निकाल देत मुख्य न्यायमूर्ती ऋतुराज अवस्थी यांच्या नेतृत्त्वाखालील उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने याचिका फेटाळून लावली होती. त्यानंतर 15 मार्च 2022 रोजी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.









