सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला निर्देश
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी मतदार यादी तपासण्यासाठी विशेष सघन पुनरावृत्ती (एसआयआर) सुरू आहे. विशेष सघन पुनरावृत्तीबाबत सर्वोच्च न्यायालयातही याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. या याचिकांवर सुरू असलेला युक्तिवाद आता निर्णायक वळणावर पोहोचला आहे. सर्वोच्च न्यायालयाने एसआयआरला स्थगिती देण्यास नकार दिला आहे, परंतु आधार कार्ड आणि मतदार ओळखपत्र कागदपत्रे म्हणून वैध करण्याचा विचार निवडणूक आयोगाला करावा अशी सूचना केली आहे. या मुद्यावर आता मंगळवार, 12 ऑगस्ट रोजी पुढील सुनावणी होईल. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जयमाल्या बागची यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्यांना 8 ऑगस्टपर्यंत त्यांचे लेखी युक्तिवाद दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. आता या प्रकरणातील पुढील सुनावणी 12 आणि 13 ऑगस्ट रोजी होईल.









