प्रशंसा करताना पाणावले पंतप्रधान मोदींचेही डोळे
@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था
उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती मुप्पावरापू व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ 10 ऑगस्ट 2022 यादिवशी संपत आहे. त्यामुळे सोमवारी त्यांना राज्यसभेत भावपूर्ण निरोप देण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे आणि इतर अनेक नेते आणि राज्यसभा सदस्यांनी त्यांची यानिमित्त प्रशंसा करणारी भाषणे केली. भाषण करताना पंतप्रधान मोदी यांचे डोळे पाणावले होते.
नवनिर्वाचित उपराष्ट्रपती जगदीप धनखड 11 ऑगस्टला या पदाची सूत्रे हाती घेणार आहेत. त्यांनी नुकताच काँगेस नेत्या मार्गारेट अल्वा यांचा पराभव करून उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकली आहे. प्रथेप्रमाणे उपराष्ट्रपतीच राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असल्यामुळे आता राज्यसभेची सूत्रेही धनखड यांच्याकडे जातील.
युवकांनी नायडूंकडून शिकावे
जे खासदार आणि युवक समाज, लोकतंत्र आणि देश यांच्या उन्नतीसाठी योगदान देऊ इच्छितात, त्यांना व्यंकय्या नायडू यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे. नायडूंचा अनुभव आणि त्यांनी केलेले परिश्रम आम्हा सर्वांना भविष्यात मार्गदर्शक ठरतील. नायडू यांच्याकडून स्फूर्ती घेऊन आम्ही लोकतंत्र आणखी बळकट करण्याचे कार्य करणार आहोत, अशी भलावण पंतप्रधान मोदी यांनी केली.
सर्वसामान्य परिवारातून
आज भारताच्या माननीय राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, लोकप्रतिनिधीगृहांचे अध्यक्ष हे सर्व स्वातंत्र्यप्राप्तीनंतर जन्माला आलेले असून सर्वजण सर्वसामान्य आणि गरीब परिवारात जन्माला आलेले आहेत. याचे एक सांकेतिक महत्व आहे. देश नव्या युगात प्रवेश करीत आहे, याचे हे प्रतीक आहे. नायडू हे याचाच एक भाग आहेत. त्यांनी अनेक पदांवर काम केले. प्रत्येक पदावर त्यांनी युवकांच्या प्रगतीसाठी परिश्रम केले. राज्यसभेतही त्यांनी युवा सदस्यांना क्रियाशील होण्यासाठी उद्युक्त केले. उपराष्ट्रपती या नात्याने त्यांनी जी भाषणे केली, त्यांपैकी 25 टक्क्यांहून अधिक युवकांशी संबंधित विषयांवर होती. भाजपचा कार्यकर्ता, आमदार, खासदार, केंद्रीय मंत्री, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आदी विविध पदांवर राहून त्यांनी जनतेची सेवा केली. कोणतेही काम त्यांनी बोजा असल्याचे मानले नाही. त्यांची निष्ठा कौतुकास्पद आहे, अशी प्रशंसा पंतप्रधान मोदींनी केली.
अनेक नेत्यांकडून कौतुक
उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष या नात्याने नायडू यांनी गेल्या पाच वर्षांमध्ये केलेल्या कामगिरीची प्रशंसा सत्ताधारी आणि विरोधी अशा अनेक नेत्यांनी केली. विशेष करुन त्यांच्या विनोदी स्वभावाचा आणि त्यायोगे विविध प्रसंगी तणाव नाहीसा करण्याच्या त्यांच्या हातोटीचेही कौतुक पंतप्रधान मोदींनी केले.
हृदयस्पर्शी आठवण, अन् नायडूंना अश्रू!
तृणमूल काँगेस नेता डेरेक ओब्रायन यांनी नायडू यांच्या जीवनातील एक हृदयस्पर्शी घटना निरोपर भाषणावेळी विषद केली. नायडू जेव्हा अवघे एक वर्षांचे होते, त्यावेळी त्यांच्या कुटुंबाकडे असणाऱया बैलाने त्यांच्या आईच्या पोटात शिंग खुपसले होते. त्यावेळी व्यंकय्या नायडू त्यांच्या आईच्या कडेवरच होते. त्यांना तेथेच सोडून त्यांच्या आईला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्यांच्या आईचा मृत्यू झाला. तेव्हापासून नायडू यांनी अत्यंत कष्टाने आणि गरीब परिस्थितीत आपली प्रगती करुन घेत ते देशाच्या उपराष्ट्रपती पदावर पोहचले. आपल्याच जीवनातील ही घटना ऐकताना नायडू यांनाही अश्रू अनावर झाले होते.
राज्यसभेत भावूक वातावरण
ड उपराष्ट्रपती, राज्यसभा अध्यक्ष नायडूंना निरोप देतेवेळी सभागृह भावनावश
ड पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक सदस्यांची नायडूंची प्रशंसा करणारी भाषणे
ड नूतन उपराष्ट्रपती, राज्यसभा अध्यक्ष जगदीप धनडख गुरुवारी सूत्रे घेणार









