महापालिकेत मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता
बेळगाव : नगरसेवक अपात्रता सुनावणी प्रकरणाची गुरुवार दि. 28 रोजी बेंगळूर उच्च न्यायालयात अंतिम सुनावणी होणार आहे. त्यामुळे या सुनावणीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. न्यायालयाने महापौर मंगेश पवार व नगरसेवक जयंत जाधव यांना अपात्र ठरविल्यास महापालिकेत पुन्हा मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे. गोवावेस येथील खाऊकट्ट्यात नगरसेवक म्हणून निवडून येण्यापूर्वी महापौर मंगेश पवार व नगरसेवक जयंत जाधव यांनी आपल्या पत्नींच्या नावे गाळे घेतले होते. मात्र, निवडून आल्यानंतर दोघांनीही सदर गाळे महापालिकेला पुन्हा परत करणे आवश्यक होते. पण त्यांनी तसे केले नाही. त्यामुळे दोघांनी अप्रत्यक्षरीत्या महापालिकेचा फायदा घेतल्याचा ठपका ठेवत सुजित मुळगुंद यांनी प्रादेशिक आयुक्तांकडे तक्रार केली होती.
या प्रकरणावर सुनावणी घेऊन तत्कालिन प्रादेशिक आयुक्त संजीव शेट्टेण्णावर यांनी दोघांनाही अपात्र ठरविले आहे. या निर्णयाविरोधात दोघांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याने सध्या अपात्रतेच्या निर्णयाला अंतरिम स्थगिती मिळाली आहे. तसेच या प्रकरणाची सुनावणीदेखील उच्च न्यायालयात सुरू आहे. यापूर्वी झालेल्या दोन सुनावणींना अॅडव्होकेट जनरल गैरहजर होते. पण शुक्रवार दि. 22 रोजी झालेल्या सुनावणीला अॅडव्होकेट जनरल उपस्थित होते. तसेच या सुनावणीवेळी तक्रारदारांच्या वकिलांनी जोरदार युक्तिवादही केला होता. त्यामुळे गुरुवार दि. 28 रोजी अपात्रता प्रकरणाची अंतिम सुनावणी होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे या सुनावणीकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. आजच्या सुनावणीत न्यायालयाने प्रादेशिक आयुक्तांचा निर्णय कायम ठेवल्यास महापालिकेत मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे.
महापौर पवार, नगरसेवक जाधव यांना कारणे दाखवा नोटीस,पंधरा दिवसांत उत्तर देण्याची सूचना
महापालिकेला सादर केलेल्या मिळकतीच्या तपशीलात खाऊ कट्ट्यासंबंधीची माहिती महापौर मंगेश पवार व नगरसेवक जयंत जाधव यांनी लपविल्याने त्यांच्याविरोधात राजकुमार टोपण्णावर यांनी मनपा आयुक्तांकडे तक्रार दाखल केली होती. याबाबतचा प्रस्ताव मनपा आयुक्तांनी प्रादेशिक आयुक्त कार्यालयाकडे दिल्याने प्रादेशिक आयुक्त के. एन. जानकी यांनी सोमवार दि. 26 रोजी महापौर मंगेश पवार व नगरसेवक जयंत जाधव यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
राजू टोपण्णावर यांनी तक्रार दिल्याने वरील दोघांनी कर्नाटक म्युनिसिपल कॉर्पोरेशन कायदा 1976 कलम 19 नुसार आपली व कुटुंबाच्या सदस्यांची स्थावर व जंगम मालमत्तेसंबंधी खोटी व अपूर्ण माहिती दिल्याने कर्नाटक म्युनिसिपल कॉर्पोरेशन कायदा 1976 कलम 19(1) आणि (2) नुसार या प्रकरणी कायदेशीर कारवाई करावी, असा प्रस्ताव प्रादेशिक आयुक्त कार्यालयाला 4 जुलै 2025 रोजी पाठविला आहे. यापूर्वीच खाऊकट्टाप्रकरणी महापौर मंगेश पवार व नगरसेवक जयंत जाधव यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे.
सदर प्रकरणाची सुनावणी उच्च न्यायालयात सुरू असल्याने तत्कालिन प्रादेशिक आयुक्तांनी राजू टोपण्णावर यांच्या तक्रारीनंतरही कोणतीच कारवाई केली नव्हती. मात्र, 22 ऑगस्ट रोजी बेंगळूर उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीवेळी प्रादेशिक आयुक्त कार्यालयाला संबंधित सुनावणीशी काही संबंध नसून ते आपले कायदेशीर काम करू शकतात, असे स्पष्टीकरण उच्च न्यायालयाने दिल्याने बेळगाव प्रादेशिक आयुक्तांनी दोघांना सोमवारी खाऊकट्टासंबंधी माहिती लपविल्याने कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे. नोटीस मिळालेल्या पंधरा दिवसांत आपले उत्तर कळवावे, अन्यथा आपले म्हणणे काही नाही, असे समजून पुढील कारवाई हाती घेतली जाईल, असे नोटिसीत म्हटले आहे. प्रादेशिक आयुक्तांनी पुन्हा दुसऱ्यांदा नोटीस दिल्याने महापौर मंगेश पवार व नगरसेवक जयंत जाधव यांच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली असून ते या नोटिसीला काय उत्तर देणार, हे मात्र पहावे लागणार आहे.









