बेळगाव : नगरसेवक अपात्रतेच्या निर्णयावर सोमवार दि. 7 रोजी उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यामुळे या सुनावणीकडे संपूर्ण बेळगावकरांचे लक्ष लागून राहिले आहे. या सुनावणीवरच स्थायी समितीच्या निवडणुकीचे भवितव्य अवलंबून असणार आहे. आजच्या सुनावणीत नेमके काय घडणार याची उत्सुकता लागली आहे. गोवावेस येथील खाऊकट्ट्यातील गाळे लिलाव प्रक्रियेत भाग घेऊन निवडून येण्यापूर्वी जयंत जाधव आणि मंगेश पवार यांनी गाळे घेतले होते. सदर गाळे त्यांनी आपल्या पत्नींच्या नावे घेतले आहेत. त्यानंतर झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत दोघेही निवडून आले. त्यावेळी सदर गाळे महापालिकेला हस्तांरित करणे गरजेचे होते. मात्र तसे न करता दोघांनीही गाळे आपल्या पत्नींच्या नावे ठेवून घेतले. दोघांनीही अप्रत्यक्षरित्या महापालिकेचा गैरफायदा घेतल्याचा आरोप करत सुजित मुळगुंद यांनी प्रादेशिक आयुक्तांकडे तक्रार केली.
त्यानंतर प्रादेशिक आयुक्तांनी जिल्हाधिकारी व मनपा आयुक्तांकडून अहवाल मागून घेतला. अहवाल आल्यानंतर या प्रकरणावर सुनावणी घेऊन दोघांनाही अपात्र ठरविले. या निर्णयाविरोधात दोघांनी नगरविकास खात्याकडे दाद मागितली. नगरविकास खात्याच्या सचिव दीपा चोळण यांनी बेळगाव प्रादेशिक आयुक्तांचा निर्णय कायम ठेवत याचिका फेटाळल्याने पुन्हा दोघेजण अपात्र ठरले. अपात्रतेच्या निर्णयाविरोधात महापौर मंगेश पवार आणि नगरसेवक जयंत जाधव यांनी उच्च न्यायालयात रीटपीटीशन दाखल केले. त्याला स्थगिती मिळाली असली तरी पुढील सुनावणी आज होणार आहे. नगरसेवक अपात्रता प्रकरणामुळे स्थायी समिती निवडणूक लांबणीवर टाकण्यात आली आहे. त्यामुळे आज होणाऱ्या उच्च न्यायालयातील नगरसेवक अपात्रता प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.









