आफताबवर हत्या अन् पुरावे नष्ट करण्याचा आरोप
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
श्रद्धा वालकर हत्या प्रकरणातील आरोपी आफताब अमीन पूनावालाच्या विरोधात दिल्लीतील साकेत न्यायालयाने हत्या आणि पुरावे नष्ट केल्याप्रकरणी आरोप निश्चित केले आहेत. आरोपीविरोधात भादंविचे कलम 302 (हत्या) आणि 201 (पुरावे नष्ट करणे) अंतर्गत गुन्हा नोंद असल्याचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश मनीष खुराना कक्कड यांनी मंगळवारी म्हटले आहे. तसेच याप्रकरणी पुढील सुनावणी 1 जून रोजी होणार असल्याचे न्यायाधीशांकडून सांगण्यात आले.
24 जानेवारी रोजी पोलिसांनी याप्रकरणी आफताबच्या विरोधात 6,629 पानी आरोपपत्र दाखल केले होते. 18 मे 2022 रोजी स्वत:ची लिव्ह इन पार्टनर श्रद्धा वालकरची गळा दाबून हत्या केल्याचा आरोप आफताबवर आहे. हत्येनंतर श्रद्धाच्या मृतदेहाचे 35 तुकडे करून ते जंगलात फेकल्याचाही आरोप आहे. दिल्ली पोलिसांनी 12 नोव्हेंबर 2022 रोजी आफताबला अटक केली होती.
तपासादरम्यान दिल्ली पोलिसांनी आफताबची नार्को अन् पॉलिग्राफ चाचणी केली होती. यात त्याने श्रद्धाच्या हत्येची बाब कबूल केल्याचे सांगण्यात आले होते. याप्रकरणी पोलिसांनी 150 हून अधिक जणांचे जबाव नोंदवले आहेत. आफताब हा वेबसीरिज आणि विशेषकरून क्राइम शो पाहायचा. यातूनच त्याला श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे फ्रीजमध्ये ठेवण्याची कल्पना सुचली होती. याचबरोबर ठार केलेल्या श्रद्धाच्या सोशल मीडिया अकौंटचा वापर करत तिच्या कुटुंबीय अन् मित्रांची दिशाभूल कसे करावे हे देखील तो याच क्राइम शोद्वारे शिकला होता. याकरता तो श्रद्धायच इन्स्टाग्राम प्रोफाइल आणि अकौंटला अपडेट करण्यासाठी त्यावर पोस्ट करत राहत होता.









