ग्राम पंचायतीने कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी
वार्ताहर/उचगाव
बेनकनहळ्ळी ग्राम पंचायतीच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या लक्ष्मीटेक रोडच्या दुतर्फा कचऱ्याचे ढीग साचल्याने येथील नागरिकांना दुर्गंधीशी सामना करावा लागत असून ग्राम पंचायतीने तातडीने कचरा टाकणाऱ्यांवरती कारवाई करावी आणि रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या कचऱ्याची उचल करावी, अशी मागणी नागरिक आणि प्रवासी वर्गातून करण्यात येत आहे. बेनकनहळ्ळीतील लक्ष्मीटेक मार्गाच्या दुतर्फा असलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यामुळे परिसरातील वातावरण दूषित झाले आहे. या रस्त्यावरून ये जा करणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीशी सामना करावा लागत आहे. या भागातील अनेक नागरिक विनाकारण घरातील व इतर केरकचरा रस्त्याच्या दुतर्फा फेकून देतात. त्याचा त्रास या मार्गावरून ये-जा करणाऱ्यांना होत आहे. या तीव्र दुर्गंधीमुळे नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. ग्राम पंचायतने नियमितपणे हा केरकचरा उचलण्याची सोय करावी. तसेच नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जागृती करणे आवश्यक आहे. नागरिकांनीही कचरा उघड्यावर न टाकता योग्य ठिकाणी त्याची विल्हेवाट स्वत:च लावण्याची जबाबदारी घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे. या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन नागरिकांची गैरसोय टाळावी, अशी मागणी करण्यात येत आहे.









