वेळेत उचल न झाल्याने संताप : दुर्गंधीने नागरिक हैराण
बेळगाव : शहरात कचऱ्याची उचल न झाल्याने शुक्रवारी सर्वत्र कचऱ्याचे ढिगारे पाहायला मिळाले. विशेषत: बेळगावची मुख्य बाजारपेठ समजल्या जाणाऱ्या मारुती गल्ली, गणपत गल्ली, हुतात्मा चौक या परिसरात कचऱ्याचे ढीग साचले आहेत. दुर्गंधीमुळे आसपासचे व्यापारी हैराण झाले आहेत. त्यामुळे महानगरपालिकेच्या अनागोंदी कारभाराविरोधात नागरिकांनी संताप व्यक्त केला. शहरातील कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. वाढत्या शहरीकरणामुळे कचऱ्यामध्येही वाढ झाली आहे. शुक्रवारी शहराच्या मध्यवर्ती भागात सकाळच्या सुमारास कचऱ्याची उचल न झाल्याने कचरा तसाच पडून होता. सध्या लग्नसराईचे दिवस असल्याने कोकण, गोवा, चंदगड येथून नागरिक खरेदीसाठी बेळगावमध्ये येत आहेत. परंतु या नागरिकांना कचऱ्याच्या दुर्गंधीशी सामना करावा लागत आहे. स्थानिक व्यापाऱ्यांच्या व्यवसायावरही दुर्गंधीमुळे परिणाम होत आहे.
वेळेत कचरा उचल करण्याची मागणी
हुतात्मा चौक येथे तर संपूर्ण परिसर कचऱ्याने भरला होता. कचऱ्यातील प्लास्टिक उडून आसपासच्या दुकानांमध्ये जात असल्याने व्यापाऱ्यांनी संताप व्यक्त केला. हुतात्मा चौकातून पुढे भंगीबोळ असल्याने या कचऱ्यातूनच नागरिकांना वाहने हाकावी लागत आहेत. कचऱ्याचे ढीग पाहून परगावावरून आलेल्या नागरिकांनीही नाराजी व्यक्त केली. त्यामुळे वेळेत कचऱ्याची उचल करावी, अशी मागणी होत आहे.








