दुर्गंधी पसरल्याने नागरिकांची गैरसोय : तातडीने कचरा उचल करण्याची मागणी
बेळगाव : भातकांडे स्कूलनजीकच्या क्रॉसवर मोठ्या प्रमाणात कचऱ्याचा ढीग पडला आहे. मात्र तो हटविण्याकडे महानगरपालिकेने दुर्लक्ष केले असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. याचा त्रास शालेय विद्यार्थ्यांसह या मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांवर सहन करण्याची वेळ आली आहे. तातडीने कचऱ्याची उचल करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे. शहर व उपनगरात पुन्हा ठिकठिकाणी ब्लॅकस्पॉट निर्माण झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. सध्या शहरातील कचऱ्याची उचल ठेकेदार आणि महापालिकेच्यावतीने केली जात असली तरी लवकरच शहर स्वच्छतेचा ठेका बेंगळूर येथील एका कंपनीला देण्यात आला असल्याने यापुढे कचऱ्याची उचल एकच ठेकेदार करणार आहे. त्यामुळे कचरा समस्या दूर होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत असून सध्या मात्र ठिकठिकाणी पडलेला कचरा उचलण्यात यावा, अशी मागणी केली जात आहे. भातकांडे स्कूलजवळ प्लास्टिक तसेच ओला व सुका कचरा टाकण्यात आला असून त्याची तातडीने उचल करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.









