20 वे येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संमेलन अमाप उत्साहात : एकूण 5 सत्रात आयोजन : समाजप्रबोधनासह प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन
वार्ताहर/येळ्ळूर
बहुतेक राष्ट्रांमध्ये घरातील बोलण्याची, शिक्षणाची, साहित्याची, संशोधनाची भाषा एकच असते. पण, आपल्याकडे त्याला अपवाद आहे. त्यामुळे सीमावादाचे प्रश्न निर्माण झाले आहेत. याबाबतच्या राजकीय समस्या वेगळ्या असून, त्यांच्या द्वेषाने भाषेचे शत्रू निर्माण होतात. भाषेवर कोणाचा दबाव नसावा. आंतरराष्ट्रीय पातळीवर भाषेच्या सीमारेषा हाताळल्या जातात. याचा अभ्यास व्हावा, असे विचार जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयाचे प्रा. डॉ. शरद बाविस्कर यांनी संमेलनात अध्यक्षीय भाषणात मांडले. ते म्हणाले, भाषेचा प्रश्न सोडविण्यासाठी उपाय शोधला पाहिजे. न्यायालयाने त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. बहुभाषिकपणा आधीही होता आणि पुढेही राहील, पण त्यासाठी आपण आपले घर फोडू शकत नाही, हे न्यायालयाने पाहिले पाहिजे. बुद्धीचा सुदृढ विकास हा मातृभाषेतूनच होतो, हे जागतिक तत्त्वज्ञान आहे.
भाषा ही समाज, राजकारण आणि व्यक्तिमत्त्व विकास यांच्याशी जुळलेली आहे, हे राजकारण्यांना का समजत नाही. राजकीय सीमांचा भाषिक सीमांशी काही एक संबंध नसतो. त्या सीमा अर्थहीन करणे हाच उपाय आहे. भाषेचे विकेंद्रीकरण राजकारणाच्या विकेंद्रीकरणाप्रमाणे झाले पाहिजे. आईचे प्रेम हे आईचे असते. त्यामुळे असे भाषेचे प्रश्न राजकारणाशी न जोडता न्यायाशी जोडले पाहिजेत, असे त्यांनी सांगितले. चिकित्सक बुद्धीने न्याय बुद्धीची भाषा समृद्ध केली पाहिजे. पण आपल्याकडे त्यावरील साहित्य कमी आहे. आपल्या राज्यात भाषेची पुस्तके इतर भाषिक किती वाचतात, असा प्रश्न करून साहित्य राजकारणाच्या आहारी गेले आहे, ते यापुढेही जात राहील, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. चिकित्सक बुद्धी विकसित होईल तेव्हाच मुलांच्या हाती पुस्तके येतील. पाश्चिमात्य देश ज्ञानाला देव न मानताही पुढे आहेत. राष्ट्राची प्रगती शिक्षण, संशोधन आणि उत्पन्न यावर मोजली जाते. अर्थकारणावर नागरिकांचा अधिकार असला पाहिजे, तरच प्रगती साधली जाईल.
आज लोकशिक्षणाची खरी गरज असून त्यासाठी चिकित्सक बनले पाहिजे. पालकांना आपले पालकत्व समजले पाहिजे, मुलांसाठी वेळ काढा, त्यांच्या समस्यांकडे लक्ष द्या, संवाद साधत समस्या समजून घेणे पालकांसाठी आवश्यक आहे. मुलांच्या सामाजिक हितासाठी काय हितकारक आहे हे त्यांच्याकरवी कृतीतून करून घ्या. त्यासाठी कौटुंबिक शाळा महत्त्वाची असून, त्यासाठी पालकांची वैचारिकता सुदृढ असली पाहिजे, असे पालकांना त्यांनी सांगितले. 20 व्या येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाची सुरुवात सकाळी 9 वा. ग्रंथदिंडीने झाली. संमेलनाध्यक्ष डॉ. शरद बाविस्कर यांच्या हस्ते पालखी पूजन होऊन चांगळेश्वरी मंदिरापासून ग्रंथदिंडीला सुरुवात झाली. यावेळी आर. एम. चौगुले, दुधाप्पा बागेवाडी, रेणू किल्लेकर, शिवाजी सायनेकर, प्रकाश अष्टेकर आदी उपस्थित होते. ग्रंथदिंडीमध्ये ज्ञानेश्वर भजनी मंडळ कारभार गल्ली, वडगाव, चांगळेश्वरी हायस्कूलच्या विद्यार्थिनींचे लेझीम पथक, शिवाजी हायस्कूलचे एनसीसी पथक व स्वरांगण ढोलताशा पथक सहभागी झाले होते. यावेळी सुहासिनी आरती ओवाळून स्वागत करत होत्या. पाहुणे व ग्रंथदिंडीचे स्वागत सेवा सोसायटी, शाळा, हायस्कूल व ग्रामपंचायतीच्यावतीने करण्यात येत होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार घालून मान्यवरांनी वंदन केले.
ग्रंथदिंडी संमेलननगरीजवळ येताच दिवंगत अॅड. परशुराम जोतिबा नाईक संमेलननगरीचे उद्घाटन अॅड. सुधीर चव्हाण यांच्या हस्ते, दिवंगत साहित्यिक महादेव मोरे प्रवेशद्वाराचे उद्घाटन गणपती बाबुराव पाटील (बाची) यांच्या हस्ते, दिवंगत बाबुराव जोतिबा गोरल ग्रंथालयाचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते यल्लुप्पा पाटील यांच्या हस्ते, दिवंगत रामचंद्र हणमंत गोरल सभामंडपाचे उद्घाटन अमर अशोक जाधव (उचगाव) यांच्या हस्ते, स्वामी विवेकानंद विद्यापीठाचे उद्घाटन उद्योजक अभिषेक पाखरे यांच्या हस्ते झाले. संमेलनाची सुरुवात शिवाजी विद्यालयाच्या मुलींच्या स्वागतगीताने झाली. दीपप्रज्वलन उद्घाटक आर. एम. चौगुले यांच्या हस्ते झाले. प्रास्ताविकात सी. एम. गोरल यांनी भाषेचा व साहित्याचा वारसा पुढील पिढीकडे सोपवून ही चळवळ अशीच सुरू राहील, असे सांगितले. अध्यक्ष परशराम मोटराचे यांनी संमेलनात केलेल्या ठरावांचे वाचन केले.
यावेळी आर. एम. चौगुले म्हणाले, मनुष्याला मूलभूत सुविधा हव्या असतात तशा भाषेलाही हव्या असतात. भाषेवर प्रभुत्व असेल तर आपण समाजात निर्भिडपणे वावरू शकतो. आजपर्यंत येळ्ळूर गावाने संघर्ष करत मराठीचे मराठीपण टिकविले आहे. त्यांनी हे यज्ञकुंड असेच तेवत ठेवावे, असे सांगितले. त्यानंतर साहित्य संघाच्यावतीने देण्यात आलेल्या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. त्यामध्ये राष्ट्रवीरकार शामराव देसाई साहित्यिक पुरस्कार दत्ता देसाई यांना, कै. मारुती पाटील (पेंटर) सामाजिक पुरस्कार डॉ. रमेश दंडगी यांना, रमाबाई आंबेडकर महिला सामाजिक पुरस्कार डॉ. सुरेखा पोटे यांना, गुरुवर्य गावडोजी पाटील आदर्श शिक्षक पुरस्कार संजय मजुकर यांना, कै. कृष्णा मुचंडी पत्रकारिता पुरस्कार शिवाजी शिंदे यांना, क्रीडा पुरस्कार महेश हगिदळे यांना, कृषी पुरस्कार चांगाप्पा टक्केकर यांना आणि डी. जी. पाटील यांचा विशेष सन्मान करण्यात आला. राजवीर बिर्जे (कराटेपटू), किसन टक्केकर, अनंत धामणेकर (सायकलपटू) आणि प्रवीण पाटील यांचाही गौरव करण्यात आला. या संमेलनासाठी गोविंद टक्केकर, सूर्यकांत शानभाग, लक्ष्मी मासेकर, नारायण खांडेकर, सरिता पाटील, नेताजी जाधव, रूपा धामणेकर, मदन बामणे, रामचंद्र गावडे, यल्लोजी मेणसे यांच्यासह संमेलन कमिटीचे सदस्य, गावकरी, विद्यार्थी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आरोग्य संस्कृतीच्या माध्यमातून आहार शोधला पाहिजे : दत्ता देसाई
संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात आपली संस्कृती आपला विकास यावर बोलताना दत्ता देसाई म्हणाले, पुस्तकांचे वाचन व आवडलेले इतरांना सांगणे यातूनच माझे चळवळीचे काम सुरू झाले. विज्ञान हे कष्टकरी, कामकरी महिला यांच्यापर्यंत पोहचले पाहिजे. यासाठी तळागाळात जाऊन काम करण्याची गरज आहे. आपल्या पूर्वजांनी ज्या चालिरीती सुरू केल्या त्या निसर्गाशी निगडीत आहेत. त्यांना पुन्हा आपल्या जीवनात आणले पाहिजे. ते पुढे म्हणाले, जीवनातील दु:खे वाचन संस्कृतीमुळे कमी करता येतात. विज्ञान संस्कृती ही नवी संस्कृती आहे. नव्या संस्कृतीने गाव बदलले पाहिजे. आरोग्य संस्कृतीच्या माध्यमातून आहार शोधला पाहिजे. आपण जसे शिकून साक्षर झालो तसे आरोग्यसाक्षर झाले पाहिजे. हे सर्व करण्यासाठी आपण निसर्गाशी जोडले गेले पाहिजे. जी आत्मिक शांतता निसर्गात मिळते ती इतरत्र मिळत नाही. आपल्याला जनवाचन करता येणे गरजेचे आहे. स्वत:बरोबर जनांचे, संघर्षाचे वाचन करता आले पाहिजे. आणि हे सर्व विज्ञान चळवळीतून मिळते. चळवळीतून विकास शोधून साहित्य आणि जीवन यात फारकत न करता सामंजस्यपणे काम केले पाहिजे, असे सांगितले.
रंगभूमीकडे आजही प्रेक्षकांचा कल,सिनेअभिनेत्री वंदना गुप्ते यांची मुलाखत
सुप्रसिद्ध सिनेकलाकार वंदना गुप्ते यांची प्रकट मुलाखत किशोर काकडे यांनी घेतली. त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना गुप्ते यांनी दिलखुलास उत्तरे देत प्रेक्षकांच्या मनोरंजनाबरोबर आपल्या कलेच्या क्षेत्रातील जीवनपटही प्रेक्षकांसमोर मांडला. रटाळ मालिकांबाबत विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना त्यांनी प्रेक्षकांना जबाबदार धरले. प्रेक्षकांनीच जर मालिका बघितली नाही तर ती पुढे चालेल का, असा प्रश्नही त्यांनी प्रेक्षकांना केला. वाचनाबद्दल सांगताना त्यांनी मला मोठ्या व्यक्तींची चरित्रे वाचायला आवडतात, असे सांगितले. आजही रंगभूमीला प्रेक्षकांची तेवढीच आवड असून, मी आतापर्यंत 12 हजार 629 नाटकांचे प्रयोग केल्याचे त्यांनी सांगितले. बाईपण देगा देवा या सिनेमाबद्दल बोलताना, जी बाई या वयात घर चालवू शकते ती सिनेमा का करू शकणार नाही, असे सांगून प्रेक्षकांची वाहवा मिळविली. जादुच्या मोबाईलवरून तुम्हाला कोणाशी बोलायला आवडेल, असे विचारता त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी बोलायला आवडेल असे सांगत त्यांनी महाराजांना पुन्हा परत या आणि राहिलेली सर्व कामे पूर्ण करून समाजाला समृद्ध करा. तुम्ही आम्हाला अभिमान, गर्व आणि प्रतिष्ठा दिलात. तुम्ही पुन्हा या आणि बघा, आम्ही तुमच्या कार्यातून काय काय घेतोय. चुकत असेन तर मार्गदर्शन करा, असे सांगत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.
मनोरंजनाने घालवला शीण
चौथ्या सत्रात झालेल्या जुगलबंदी भारुड व तिसऱ्या सत्रात झालेल्या एक तास बसा व मनसोक्त हसा या कार्यक्रमांतून प्रेक्षकांच्या निखळ मनोरंजनाबरोबर समाजप्रबोधनही झाले. भारुडातून संदीप मोहिते व आबा चव्हाण यांनी व्यसनमुक्ती, पर्यावरण, स्त्रीभ्रूण हत्यासारख्या विषयांचे प्रबोधन केले. प्राध्यापक रणजित कांबळे यांनीही आपल्या विनोदी शैलीने प्रेक्षकांचे मनोरंजन करून आलेला शीण घालवला.









