भारताच्या जी-20 अध्यक्षतेतील ही प्रथम बैठक
@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारताला 1 डिसेंबर 2022 या दिवसापासून एक वर्षासाठी जी-20 या संघटनेचे अध्यक्ष स्थान मिळाल्यानंतची प्रथम बैठक आज मंगळवारी होत आहे. ही बैठक 18 जानेवारी ते 20 जानेवारी या कालावधीत केरळची राजधानी थिरुवनंतपुरम येथे होत आहे. केंद्रीय आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.
या बैठकीत तीन महत्वाच्या मुद्दय़ांवर जोर दिला जाणार आहे. आरोग्याच्या दृष्टीने आपत्कालीन स्थितीवर लक्ष ठेवणे, औषधनिर्मिती क्षेत्रात सदस्य देशांमध्ये परस्पर सहयोग सुनिश्चित करणे आणि डिजिटल आरोग्य क्षेत्रात नवे संशोधन करणे, हे ते तीन मुद्दे आहेत. भारताने यांवर प्रारंभापासूनच जोर दिला आहे.

जीवाणूनाशक औषधांवरही लक्ष
जीवाणूनाशक औषधांच्या अतिउपयोग किंवा गैरवापर टाळणे आवश्यक आहे. या औषधांच्या दुरुपयोगामुळे माणसाची नैसर्गिक प्रतिकारशक्ती क्षीण होत आहे. त्यामुळे रोगांचे उद्रेक अधिक प्रमाणात होत आहेत. या बैठकीत या मुद्दय़ावरही जोर देण्यात येणार असून यात भारताचा पुढाकार आहे. आरोग्याच्या दृष्टीने घातक रोगांचा किंवा उद्रेकांचा प्रभाव रोखणे हे सर्व सदस्य देशांचे उत्तरदायित्व आहे. ते त्यांनी एकत्रितरित्या निभावल्यास लोकांचे हित होणार आहे. जी-20 देशांना या संदर्भात एकत्र आणण्यात भारत पुढाकार घेईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. आरोग्यासंबंधीच्या प्राथमिकता यापुढेही सुरु राहिल्या पाहिजेत असा भारताचा आग्रह असून या बैठकीत त्यावर चर्चा होणार आहे.
असमतोल टाळणे आवश्यक
आरोग्यक्षेत्रात विविध देशांमध्ये असलेला असमतोल टाळण्याची आवश्यकता असून तसे झाल्यास कोरोनासारख्या उद्रेकांना वेळीच रोखणे किंवा लोकांचे जीव वाचविणे या कार्यांमध्ये अधिक प्रमाणात यश येईल, असे भारताचे म्हणणे असून जी-20 बैठकांच्या माध्यमातून याचा पाठपुरावा केला जाणार आहे.









