खेड / राजू चव्हाण :
गणरायाच्या आगमनास अवघे 5 दिवस उरले आहेत. गणेशभक्तांच्या सुखकर प्रवासासाठी कोकण रेल्वे प्रशासन सज्ज झाले आहे. 25 ऑगस्टपासून कोकण मार्गावरील स्थानकांमध्ये आरोग्य पथके तैनात करण्यात येणार आहेत.
प्रवाशांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने रेल्वे सुरक्षा बलासह स्थानिक पोलीसही दिमतीला राहणार आहेत. प्रत्येक रेल्वे स्थानकात प्रत्येक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची करडी नजर राहणार आहे.
कोकण मार्गावर मध्य, कोकण, पश्चिम रेल्वे आणि दक्षिण रेल्वे यांच्या समन्वयाने 366 गणपती स्पेशलच्या फेऱ्या धावणार आहेत. यात उधना, विश्वामित्री, वडोदरा, मुंबई सेंट्रल, मुंबई सीएसएमटी, लोकमान्य टिळक टर्मिनस, वांद्रे येथील स्थानकातून जादा रेल्वेच्या फेऱ्या धावणार आहेत. राज्य आरोग्य अधिकाऱ्यांच्या समन्वयाने खेड, माणगाव, चिपळूण, संगमेश्वर, कणकवली, कुडाळ व सावंतवाडी स्थानकांवर प्रथमोपचार चौक्या स्थापन करण्यात आल्या असून पॅरा-मेडिकल कर्मचारी तैनात राहणार आहेत.
कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीसाठी चिपळूण आणि रत्नागिरी आरोग्य केंद्रांवर वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी परिचारिका आणि बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी उपलब्ध असणार आहेत. रेल्वे गाड्यांच्या आगमनांसह प्रस्थानादरम्यान सर्व फूड स्टॉल खुले ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जेवण आणि अल्पोपहाराची पुरेशी उपलब्धता सुनिश्चित करण्याबाबतही सूचित करण्यात आले आहे. बुकिंग कार्यालयांमध्ये विशेष रांगेची व्यवस्था करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
माणगाव, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ व सावंतवाडी स्थानकात ‘रेल्वे यात्री सहाय्य केंद्रे’ स्थापन करण्यात आली असून प्रवाशांना मदत करण्यासाठी पर्यवेक्षक तैनात राहणार आहेत. केआरसीएल व एमएसआरटीसी पुढील प्रवासासाठी स्थानकांवर बसेस उपलब्ध करून देण्यासाठी समन्वय साधून गणेशभक्तांचा प्रवास सुखकर होईल, याकडे कटाक्षाने लक्ष देण्यात येणार आहे. स्थानकांसह गाड्यांमध्ये गर्दी व्यवस्थापनासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
प्रवासात प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी स्थानके आणि गाड्यांमध्ये विशेष तिकीट तपासणी मोहिमा राबविण्यात येणार आहेत. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी पुरेशी सुरक्षा व्यवस्था करण्यात आली असून त्या-त्या स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर 24 तास बारकाईने लक्ष ठेवले जाणार आहे. रेल्वे सुरक्षा दल आणि स्थानिक पोलिसांचा जागता पहाराही राहणार आहे. स्थानकांवर उत्सवाच्या वस्तू, ताजी फळे, फुले आणि पारंपरिक मिठाई, स्थानिक कला, संगीत सादरीकरणासाठी स्टेज, समर्पित सेल्फी पॉईंट्स, रंगीबेरंगी रांगोळी आणि विशेष प्रकाशयोजना असलेले उत्साही पूजा स्टॉल उभारण्याची मुभा देण्यात आली आहे.
- प्रवाशांनी स्वच्छता, शिस्त राखण्याचे आवाहन
कोकण रेल्वे मार्गावरुन प्रवास करताना सर्व प्रवाशांनी स्वच्छता आणि शिस्त राखण्याचे आवाहन कोकण रेल्वे प्रशासनाने केले आहे. गणेशोत्सवादरम्यान सुरक्षित वाहतूक, अखंड प्रवासी सुविधा आणि सुरळीत प्रवास अनुभव सुनिश्चित करण्यासाठी रेल्वे प्रशासन कटिबद्ध राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.








