सामाजिक आरोग्य केंद्राकडून आरोग्य संचालनालय व गोमेकॉच्या संयुक्त विद्यमाने आयोजन
प्रतिनिधी /काणकोण
काणकोणच्या सामाजिक आरोग्य केंद्राने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचे औचित्य साधून आयुष्यमान भारत योजनेंतर्गत आरोग्य संचालनालय आणि गोवा वैद्यकीय महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने 22 रोजी सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पर्यंत केंद्राजवळ आरोग्य मेळाव्याचे आयोजन केले आहे.
शिक्षणखाते, आयुष मंत्रालय, क्रीडा आणि युवा व्यवहार संचालनालय, अन्न आणि औषध संचालनालय, महिला आणि बालकल्याण संचालनाल, कला व संस्कृती संचालनालय आणि पंचायत संचालनालयाचे सहकार्य या मेळाव्याला लाभणार असून प्रत्येक खात्याचा खास स्टॉल या ठिकाणी उभारण्यात येणार आहे. प्रत्येक स्टॉलच्या माध्यमातून आरोग्यविषयक माहिती प्रसारित केली जाईल, अशी माहिती काणकोणच्या सामाजिक आरोग्य केंद्राच्या अधिकारी डॉ. स्नेहा आमोणकर यांनी दिली. यासंदर्भात आरोग्य केंद्राच्या परिषदगृहात खास बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या बैठकीला काणकोणच्या सीडीपीओ आशंका ना. गावकर, मुख्य सेविका अलका पागी, सुगंधा वेळीप, शशिकला ना. गावकर देसाई, स्वरूपा खानोलकर, सुरेखा देसाई, नीलिमा देसाई, पंचायत सचिव सुशांत ना. गावकर, शंकर नाईक, पीएचएन प्रशांत खोलकर, डॉ. दिवाकरजी वेळीप, माजी पंच दामोदर च्यारी, संजय कोमरपंत, हरिश्चंद्र खोलकर उपस्थित होते.
सदर आरोग्य मेळाव्याचे यशस्वीरीत्या आयोजन करण्यासाठी काणकोण तालुक्यातील सर्व पंच, सरपंच, पंचायत सचिव, नगराध्यक्ष त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते आणि नगरसेवकांना खास आमंत्रित करण्यात आले होते. परंतु खोतीगाव पंचायतीचे सचिव वगळता एकही पंचायत सचिव त्याचप्रमाणे अन्य लोकप्रतिनिधी या खास बैठकीला उपस्थित नव्हते. त्यामुळे लोकप्रतिनिधींचे काणकोणच्या नागरिकांच्या आरोग्याशी देणे-घेणे नाही असे वाटते अशी प्रतिक्रिया या बैठकीला उपस्थित असलेल्या प्रतिनिधींनी व्यक्त केली.
या मेळाव्यात जनरल ओपीडीबरोबरच सर्जरी, कान, नाक व घसा चिकित्सा, अस्थिचिकित्सा, नेत्रचिकित्सा, त्वचातज्ञ, बालरोगतज्ञ, दंतचिकित्सा, आयुष ओपीडी, औषधालय आणि खास प्रयोगशाळेची सोय करण्यात येणार आहे. मूत्रपिंड विकारांनी ग्रस्त रुग्ण, कर्करोगाचे रुग्ण त्याचप्रमाणे महिलांसाठी खास तपासणीची सोय यावेळी करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. आमोणकर यांनी दिली. काणकोणच्या नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीनेच अशा प्रकारच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले असून अशा प्रकारचे एकंदरित 4 मेळावे संपूर्ण गोव्यात होणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
या मेळाव्याच्या जागृतीसाठी तालुक्यातील पंचायतस्तरावर पत्रके पाठविण्यात आली आहेत. चावडीवरील बाजार, बसस्थानक त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी लोकांची गर्दी असते त्या ठिकाणी जागृती करण्यात येणार आहे. त्याचबरोबर काणकोणच्या अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन मेळाव्यासंबंधीची माहिती देणार आहेत, असे डॉ. आमोणकर यांनी स्पष्ट केले.









