कचऱ्यात बसून वर्गीकरण करण्याची वेळ : नागरिकांनी कचरा वेगवेगळा करून देण्याची नितांत आवश्यकता
बेळगाव : कचऱ्याची उचल करण्यापूर्वी मनपाच्या सफाई कर्मचाऱ्यांना सुका-ओल्या कचऱ्याबरोबरच प्लास्टिकचेही वर्गीकरण करावे लागत आहे. यासाठी कचराकुंडीच्या ठिकाणी सफाई कर्मचाऱ्यांना कचऱ्यात बसून वर्गीकरण करण्याची वेळ ओढवली आहे. त्यामुळे दुर्गंधीशी सामना करत कचऱ्याचे वर्गीकरण करून ते वाहनात भरावे लागत असल्याने सफाई कर्मचाऱ्यांचा आरोग्याचा प्रश्न आता निर्माण झाला आहे. यापूर्वी सफाई कर्मचारी शहर आणि उपनगरात घरोघरी जाऊन कचरा गोळा करत होते. कचरा वाहू वाहनात कचरा टाकून तुरमुरी येथील कचरा डेपोत डंपिंग केले जात होते. पण, अलीकडेच कचरा उचल करण्यापूर्वी ओल, सुका आणि प्लास्टिक कचऱ्याचे वर्गीकरण करण्यात यावे. त्यानंतरच कचरा वाहनातून नेऊन त्याचे डपिंग करण्याची सूचना करण्यात आली असल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे. नागरिकांकडून कचऱ्याचे वर्गीकरण केले जात नसल्याने हे काम सफाई कर्मचाऱ्यांनाच करावे लागत आहे. तसेच ठिकठिकाणी टाकण्यात येणाऱ्या कचऱ्याच्या ठिकाणी सफाई कर्मचारी बसून कचऱ्याचे वर्गीकरण करताना दिसत आहेत. कचराकुंड्यांच्या ठिकाणी गलिच्छ वातावरण निर्माण झालेले असते. तशातच कचऱ्यात बसून सफाई कर्मचाऱ्यांना वर्गीकरण करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे रोगराई पसरण्याची भीती व्यक्त केली जात असून सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा प्रŽ आता ऐरणीवर आला आहे.









