प्लास्टिकच्या निर्बंधाबाबत मनपाला विसर : सफाई कामगारांच्या आरोग्याचा प्रश्न , आरोग्य विभागावर कारवाई होणार का?
बेळगाव : प्लास्टिकची विक्री आणि वापरावर बंदी असल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागालाच विसर पडल्याचे दिसून येत आहे. कारण सफाई कामगारांना सकाळच्यावेळी देण्यात येणारा अल्पोपाहार प्लास्टिकच्या पिशव्यांमधून आणण्यासह प्लास्टिक कव्हर असलेल्या प्लेटमधूनच दिला जात आहे. हा सारा प्रकार पाहता दिव्याखाली अंधार असे म्हणण्याची वेळ आली असून इतरांवर दंडात्मक कारवाई करणाऱ्या मनपाच्या आरोग्य विभागावर कोण कारवाई करणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
प्लास्टिकमुळे पर्यावरणाची हानी होत असल्याने सिंगल युज प्लास्टिकच्या विक्री आणि वापरावर बंदी घालण्यात आली आहे. 1 जुलै 2022 पासून बंदी घालण्यात आली असल्याने प्लास्टिकऐवजी कापडी पिशव्यांचा वापर करण्यात यावा, यासाठी सरकारकडून प्रोत्साहन दिले जात आहे. मात्र, अद्यापही बहुतांश ठिकाणी खुलेआम प्लास्टिकची विक्री आणि वापर सुरूच आहे. मानवी जीवनावरदेखील प्लास्टिकचा काही प्रमाणात दुष्परिणाम होत असल्याने सिंगल युज प्लास्टिक विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे.
शहरातील मुख्य बाजारपेठेत प्लास्टिकची विक्री करणारी अनेक दुकाने आहेत. त्यांच्यावर महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून वारंवार छापेमारी करून दंडात्मक कारवाई केली जाते. तसेच प्लास्टिकचा वापर करू नये, यासाठी समाजाला प्रबोधनाचे धडे देणाऱ्या मनपाच्या आरोग्य विभागालाच आता प्लास्टिकच्या वापरावर बंदी असल्याचा विसर पडल्याचे चित्र दिसून येत आहे. गेल्या महिनाभरापासून महानगरपालिकेच्या सफाई कामगारांना सकाळच्यावेळी अल्पोपाहार दिला जात आहे. त्याचबरोबर एक अंडेही दिले जाते. सफाई कामगारांना सकाळच्यावेळी अल्पोपाहार पुरवण्याची जबाबदारी इंदिरा कॅन्टीनवर सोपविण्यात आली आहे. ज्या ठिकाणी सफाई कामगार कार्यरत आहेत, त्या ठिकाणी अल्पोपाहार आणून दिला जात आहे. मात्र, यासाठी प्लास्टिक पिशव्यांचा वापर केला जात आहे.
अल्पोपाहार घेऊन जाण्यासाठी स्टील किंवा काचेच्या पात्रांचा वापर करणे गरजेचे आहे. मात्र, प्लास्टिक पिशव्यांमधूनच अंडी व इतर साहित्य आणले जात आहे. इतकेच नव्हे तर अल्पोपाहार आणि अंडी देण्यासाठी प्लास्टिकचा थर असलेल्या प्लेट्सचा उपयोग केला जात आहे. त्यामुळे हा सारा प्रकार पाहता दिव्याखाली अंधार असे म्हणण्याची वेळ आली आहे. प्लास्टिकची विक्री आणि वापर करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणाऱ्या आरोग्य विभागावर कोण कारवाई करणार? मनपा आयुक्त या गंभीर प्रकाराकडे लक्ष देणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
फोटो व्हायरल झाल्याने सर्वत्र चर्चेचा विषय
महापालिकेच्या सफाई कामगारांना सकाळच्यावेळी देण्यात येणारा अल्पोपाहार प्लास्टिकच्या पिशव्यांतून आणला जात आहे. तसेच प्लास्टिकचा थर असलेल्या प्लेट्समधून अल्पोपाहार सफाई कामगारांना खाण्यासाठी दिला जात आहे. याबाबतचे 25 आणि 26 फेब्रुवारीचे फोटो व्हायरल झाले असल्याने हा सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे.









