प्रतिनिधी /फोंडा
दुर्भाट येथील स्व. वसंत गणसू नाईक चॅरिटेबल ट्रस्टतर्फे नुकतेच आरोग्य चिकित्सा शिबिर आयोजित करण्यात आले. गोवा वैद्यकीय महाविद्यालय, आर. जी. इस्पितळ पर्वरी, ए. एस. जी. नेत्रचिकित्सा इस्पितळ मिरामार व सार्थक फाऊंडेशन फोंडा यांच्या संयुक्त विद्यमाने दुर्भाट येथील सिद्धारुढ मठात हे शिबिर घेण्यात आले.
शिबिरात आरोग्य तपासणी व नेत्रचिकित्सा याबरोबरच रक्तदानही करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन अग्नीशामक दलाचे संचालक नितीन रायकर यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. सोमेश तारी, डॉ. सुजय मिश्रा, डॉ. पूजा, स्थानिक पंचसदस्य कृष्णा नाईक, सिद्धारुढ मठाचे अध्यक्ष अजित फडते, सार्थक फाऊंडेशनचे सुदेश नार्वेकर, वसंत नाईक ट्रस्टचे विश्वस्त विष्णू वसंत नाईक व हनुमंत वसंत नाईक हे उपस्थित होते.
या शिबिरांतर्गत साधारण 250 रुग्णांची तपासणी करण्यात आली. 25 युवकांनी रक्तदान केले. नितीन रायकर व डॉ. सोमेश तारी यांनी ग्रामीण भागात आरोग्य जागृती होण्यासाठी अशा प्रकारची शिबिरे आवश्यक असल्याचे सांगितले. हनुमंत नाईक यांनी सूत्रसंचालन केले.









