ऑनलाईन टीम/तरुण भारत
हळद आयुर्वेदीक औषध म्हणून आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. पण कच्ची हळद नेमकी कशी वापरावी ते आपल्याला कळत नाही कच्च्या हळदीचा वापर आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. (Health Benefits of Raw Turmeric)
वातावरणात बदल झाला की बऱ्याच जणांना सर्दी, खोकला येतो. तर काहींना हिवाळ्याच्या दिवसांत सर्दी, खोकला यांसारख्या आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवतात. या सगळ्या समस्यांवर कच्ची हळद सामान्यत: प्रतिबंध करण्यासाठी औषध म्हणून वापरली जाते. कच्ची हळद अर्थात ओली हळद औषधी गुणांचा खजिना आहे. हळद पावडरपेक्षा कच्ची हळद आरोग्यासाठी अधिक फायदेशीर आहे. साधारणतः हिवाळ्यामध्येच ओली हळद बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होते. त्यामुळे कच्चा हळदीचे काय फायदे आहेत हे जाणून घेऊया.
हृदयरोगात फायदेशीर
कच्च्या हळदीचे नियमित सेवन केल्याने खराब कोलेस्ट्रॉल कमी होते आणि त्यामुळे हृदयाशी संबंधित सर्व समस्यांचा धोका कमी होतो.
प्रोटेस्ट कर्करोगापासून शरीराचे संरक्षण
पुरुषांमध्ये आढळणाऱ्या प्रोस्टेट कर्करोगावर कच्ची हळद अतिशय गुणकारी ठरते. कच्ची हळद कर्करोग पेशींना वाढण्यास प्रतिबंधित करते, तसेच त्यांना नष्ट देखील करते. कच्च्या हळदीचे सेवन ट्युमरला प्रतिबंधित करते.
रोग प्रतिकारकशक्ती बळकट होण्यास मदत
कच्च्या हळदीच्या सेवनाने रोगप्रतिकार शक्ती मजबूत होण्यास मदत होते. हळद सर्दी, पडसे, खोकला आणि ताप प्रतिबंधित करते. तसेच, हळदीत भरपूर प्रमाणात आढळणारे अँटीसेप्टिक आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म शरीरातील बुरशीजन्य संक्रमण काढून टाकते.
चेहऱ्यावरील डाग कमी करते
चेहऱ्यावर काळे डाग पडले असल्यास, अर्धीवाटी बेसन पिठात 2 चमचे लिंबाचा रस आणि कच्च्या हळदीचा छोटासा तुकडा पेस्ट करून घाला. थोडेसे दूध टाकून या मिश्रणाला व्यवस्थित मिक्स करून, पेस्ट तयार करून घ्या. ही पेस्ट 10 मिनिटांसाठी चेहऱ्यावर किंवा डागांवर लावा. व्यवस्थित सुकल्यानंतर कोमट पाण्याने धुवून टाका. यामुळे चेहऱ्यावरील डाग कमी होतील.
पचनशक्ती वाढते
कच्च्या हळदीमध्ये अँटिऑक्सिडंट आणि अँटी इन्फ्लेशनरी गुणधर्म असतात, ज्यामुळे तुमची पचनक्रिया मजबूत होते. तसेच अन्न पचण्यास मदत होते. कच्च्या हळदीचा वापर अन्नात अनेक प्रकारे केला जातो. हळदीच्या वापरामुळे जेवणाची चवही वाढते.
इन्सुलिन संतुलित करते.
कच्ची हळद शरीरातील इन्सुलिन संतुलित करते. तसेच, ग्लूकोज नियंत्रित करते. त्यामुळे मधुमेह असलेल्या रुग्णांसाठीही कच्ची हळद खूप फायदेशीर ठरते. हळद यकृतासाठीही खूप फायदेशीर आहे, असे बर्याच संशोधनात समोर आले आहे. यामुळे यकृताचे कार्य सुधारते.
संधिवातावर गुणकारी
संधिवातादरम्यान जळजळ कमी करण्यासाठी वर्षानुवर्षे कच्च्या हळदीचा वापर केला जात आहे. कच्ची हळद सांधेदुखी कमी करण्यास प्रभावी आहे. तसेच, कच्ची हळद शरीराच्या नैसर्गिक पेशी नष्ट करणारे फ्री रॅडिकल्स देखील काढून टाकते.