प्रतिनिधी / बेळगाव
फोन पे द्वारे दोन हजारांची लाच घेणाऱया आरोग्य व कुटुंब कल्याण खात्याच्या विभागीय सहसंचालक कार्यालयातील प्रथम दर्जा साहाय्यकाला एसीबीच्या अधिकाऱयांनी गुरुवारी अटक केली.
भीमराव इराप्पा मादर या प्रथम दर्जा साहाय्यकाला अटक केली आहे. एसीबीचे पोलीस अधीक्षक बी. एस. नेमगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक जे. एम. करुणाकर शेट्टी, पोलीस निरीक्षक गुदीगोप्प व त्यांच्या सहकाऱयांनी बेळगाव येथील आरोग्य विभागाच्या कार्यालयात ही कारवाई केली.
रहिमनगर, विजापूर येथील संतोष चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एसीबीच्या अधिकाऱयांनी ही कारवाई केली. संतोष यांची आई के. एस. कुळली या प्राथमिक आरोग्य केंद्र, गोठे, ता. जमखंडी, जि. बागलकोट येथे प्राथमिक आरोग्य सुरक्षा अधिकारी म्हणून सेवेत होत्या.
तीस वर्षे प्रदीर्घ सेवा बजावल्यामुळे एक अतिरिक्त वेतन बढती मंजूर करण्यासाठी आरोग्य व कुटुंब कल्याण खात्याच्या बेळगाव विभागीय सहसंचालक (प्रशासकीय) कार्यालयातील प्रथम दर्जा साहाय्यक असणाऱया भीमराव मादर यांनी दोन हजारांची लाच मागितली होती.
फोन पे च्या माध्यमातून त्यांनी ही लाच स्वीकारली असून एसीबीच्या अधिकाऱयांनी त्यांचा मोबाईल जप्त केला आहे.









