चेअरमन आणि सचिवांचे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप
डिसेंबरमध्ये निवडणूक, दोन महिने आधीच उडतोय धुळ्ळा
कोल्हापूर/अहिल्या परकाळे
जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघात जवळपास 50 वर्षे स्वर्गीय शिक्षणतज्ञ डी. बी. पाटील गटाची सत्ता होती. संघाच्या 2017 च्या निवडणुकीत पाटील गटा विरोधात प्रचार करून दादासाहेब लाड, बाबा पाटील आणि विलास साठे यांच्या नेतृत्वाखाली विद्यमान संचालक मंडळ सत्तेवर आले. 2020 ला तीन वर्षाचा कार्यकाल संपल्यानंतर वार्षिक सभा घेऊन विद्यमान संचालकांनाच तीन वर्षाची मुदतवाढ दिली. परंतु अलीकडे या संचालकांमध्येच वादाची ठिणगी पडली आहे. एकमेकांच्या कामकाजावर शंका घेत खुद्द चेअरमन आणि सचिवांनीच एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपास सुरूवात केली आहे. दोघांच्या वादात संघाचे अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याने सभासदांत संभ्रमाचे वातावरण आहे.
मुख्याध्यापक संघात मनमानी कारभाराचा आरोप करत विद्यमान संचालक मंडळ सत्तेवर आले. पाच वर्षे गुण्यागोविंदाने नांदलेही, परंतु वर्षभरापासून या संचालक मंडळातच फुट पडली. या फुटीमुळे चेअरमन आणि सचिवांत वारंवार वाद होत आहेत. डिसेंबरमध्ये मुख्याध्यापक संघाची निवडणूक असल्याने दोन महिने अगोदरच अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहेत. आपलीच सत्ता यावी यासाठी सचिव आणि चेअरमन आरोप, प्रत्यारोप करत आहेत, आपणच घटनेनुसार बरोबर असल्याचे ते सांगत आहेत. परंतु दोघांच्या वादात तिसऱ्याचा लाभ होणार, अशी चर्चा संघाच्या साडेसातशे सभासदांमध्ये आहे. त्यामुळे संचालकांनी कितपत वाद चिघळावा, याचा विचार करण्याची गरज असल्याची चर्चा आहे.
संघाकडून काढण्यात येणाऱ्या प्रश्नपत्रिकांवर 1300 शाळा परीक्षा घेत होत्या. परंतु संघाच्या गलथान कारभारामुळे अलीकडे प्रश्नपत्रिका घेणाऱ्या शाळांची संख्या कमी होत आहे. संघाची प्रश्नपत्रिका सध्या 35 शाळा घेत नाहीत. त्यामुळे मुख्याध्यापक संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, अंतर्गत राजकारणाची शिक्षकांत चर्चा सुरू आहे. विद्यार्थी, शिक्षक, कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक, विद्यार्थ्यांना स्पर्धाद्वारे प्रोत्साहन हे संघाचे कर्तव्य आहे. परंतु कित्येक वर्षापासून संघाने विद्यार्थी हिताकडे दुर्लक्ष केल्याची चर्चा आहे. चेअरमन आणि सचिवांचा वाद मिटवण्यासाठी शिक्षक नेत्यांनी पुढाकार घ्यावा, अशी भूमिका काही मुख्याध्यापकांची आहे. परंतु या वादाकडे शिक्षक नेत्यांनीच दुर्लक्ष केल्याने, हा वाद चिघळल्याचे, काही मुख्याध्यापकांचे म्हणणे आहे.
25 संचालकांची कार्यकारिणी
संघाची 750 सदस्यसंख्या आहे. त्यापैकी 25 जणांची कार्यकारिणी आहे. यामध्ये 17 पुरूष व 2 महिला आणि 6 पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. यापैकी 3 मुख्याध्यापक निवृत्त झाले. उर्वरीत 22 संचालकच सध्या संघाचा कारभार करतात. त्यांच्यातच दोन गट पडले असून अंतर्गत वादाची ठिणगी पेटली आहे.
सचिवांचे अधिकार काढून घेतले आहेत.
घटनेतील तरतुदीनुसार चेअरमनच्या परवानगीशिवाय सचिवांना सभा घेता येत नाही. पदाधिकारी व कार्यकारिणीच्या बैठकीतील निर्णयाच्या कार्यवाहीची जबाबदारी सचिवांवर असते. कार्यकारिणीच्या परवानगीशिवाय सचिवांना कोणताही निर्णय घेता येत नाही. तरीही एकाधिकारशाहीने सचिवांनी काही निर्णय घेतल्याने यंदा 10 ऑगस्टला झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत सचिवांचे अधिकार काढून घेतले आहेत.
सुरेश संकपाळ (चेअरमन, मुख्याध्यापक संघ)
चेअरमनची राजकीय स्टंटबाजी”
संघाच्या घटनेनुसार नोटीस काढण्याचे अधिकार सचिवांना असतात. यंदा 17 सप्टेंबरला चेअरमन यांचे अधिकार बहुमताने काढून घेतले आहेत. घटनेनुसार नोटीस काढण्याचा त्यांना अधिकार नाही. सर्व रेकॉर्ड सचिवांकडे आहे. नियमित कामकाज पाहणे आपले कर्तव्य आहे. त्यामुळे आत्तापर्यंत प्रामाणिकपणे काम केल्याने, आपल्याबद्दल कोणतीही तक्रार नाही. निवडणूक प्रक्रिया सुरू होत असल्याने चेअरमन राजकीय स्टंटबाजी करत आहेत.
दत्ता पाटील (सचिव, मुख्याध्यापक संघ)









