Kolhapur Crime News : कसबा वाळवे ता. राधानगरी येथील संस्थेच्या एका शाळेत मुख्याध्यापक म्हणून काम करत असलेल्या सचिवाने अध्यक्षांची खोट्या सह्या मारून सुमारे सव्वा लाख रुपये इतका अपहार केल्याची फिर्याद संस्थेचे संचालक रंगराव धोंडी पाटील रा. कसबा वाळवे यांनी राधानगरी पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार संशयित मुख्याध्यापक अशोक रंगराव पाटील व त्यात शाळेत काम करणाऱ्या त्यांच्या पत्नी प्रतिभा अशोक पाटील रा.मांगोली ता.राधानगरी या गैर व्यवहाराबद्दल दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित आरोपीवर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत राधानगरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्याद नुसार, 1989 साली दूधगंगा वेदगंगा शिक्षण प्रसारक मंडळ मांगोली ता राधानगरी या संस्थेची स्थापना झाली. या संस्थेमार्फत कसबा वाळवे येथे प्रतिभा गर्ल्स स्कूल नावाने 1990 साली शासनमान्य शाळा सुरू झाली. तेव्हापासून संचालक मंडळामार्फत शाळेचे विश्वस्त कामकाज पाहत होते. संस्थेच्या स्थापनेपासून अशोक रंगराव पाटील हे संस्थेचे सचिव व शाळेत मुख्याध्यापक म्हणून काम पाहत होते. त्याचबरोबर प्रतिभा अशोक पाटील ह्या त्यांच्या पत्नी 1997 पासून सहाय्यक शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. दरम्यान, मुख्याध्यापक आणि सचिव असलेल्या अशोक पाटील यांनी संस्थेचे अध्यक्ष तुकाराम बापूसो पाटील यांच्या खोट्या सह्या करून गैरव्यवहार करत असल्याचे शाळेत काम करणाऱ्या एका लिपिकाने 2022 मध्ये निदर्शनास आणून दिले. त्या अनुषंगाने अध्यक्ष तुकाराम पाटील यांनी संस्थेमार्फत के.डी. सी. सी बँकेत झालेल्या व्यवहाराचे बँक स्टेटमेंट घेतले. त्यामध्ये संशयित वाटणाऱ्या व्यवहाराच्या चेकच्या प्रती बँकेकडून प्राप्त केल्या. त्यानुसार संबंधित मुख्याध्यापक आणि सचिव यांनी जवळपास नऊ लोकांना अकाउंट चेक न देता बेअरर चेक जवळपास एक लाख 26 हजार दोनशे रुपये उचल करून अफरातपर केल्याची शक्यता गृहीत धरून राधानगरी पोलीस ठाण्यात संचालक मंडळाच्या वतीने संस्था संचालक रंगराव पाटील यांनी फिर्याद दिली.दिलेल्या बेअरर चेकवर खोट्या सह्या असल्याचा फॉरेन्सिक लॅब पुणे यांचा अहवाल प्राप्त झाल्याने संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, संस्था संचालक मंडळाने जानेवारी 2023 मध्ये दप्तर पाहणी केली असता ऑक्टोबर 2012 ते ऑक्टोबर 2013 या एक वर्षाच्या कालावधीत संस्थेच्या लिपिकाने रजा काढली होती. या रजेच्या कालावधीत हजेरी पत्रकावर सहयांचे कागद चिकटवून छेडाछेड केल्याचे दिसून आले. तसेच शालेय पोषण आहार,क्रीडा साहित्य,ग्रंथालय पुस्तके यांचीही अफरातपर केलेचे नवीन मुख्याध्यापक यांच्या निदर्शनास आले आहे. त्यानंतर संस्थेचे मुख्याध्यापक आणि सचिव असलेले अशोक रंगराव पाटील यांनी दिनांक 29 ऑगस्ट 2021 रोजी आपल्या सचिव पदाचा राजीनामा दिला होता. त्यावेळी सचिव पदाचा शिक्का ही संस्थेत जमा केला. त्यामुळे सदरचा राजीनामा संस्थेच्या संचालक मीटिंगमध्ये मंजूर करून सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय कोल्हापूर येथे बदल अर्ज दाखल केला. असे असताना नंतर संस्थेच्या लेटर पॅडचा गैरवापर केल्याचे व स्वतःचे सेवा पुस्तक गहाळ केल्याचे दिसून आले. यामध्ये त्यांच्या पत्नी प्रतिभा अशोक पाटील यांचा सहभाग असल्याने पती-पत्नीवर संस्थेमध्ये अफरा-तफर केल्याच्या संशयावरून फिर्याद दाखल केली आहे. त्याचबरोबर अशाप्रकारे संस्था अध्यक्षांच्या खोट्या सहीचा गैरवापर करून आणखीन काही रकमेचा आर्थिक व्यवहार झाल्याचा संशय संचालक मंडळाने व्यक्त आहे.









