
बेळगाव : रामतीर्थनगर परिसरातील विविध विकासकामे करण्यात येत आहे. मात्र मागील चार महिन्यापूर्वी सुरू करण्यात आलेली कामे अद्यापही अपूर्ण आहे. खोदण्यात आलेले रस्ते आणि अर्धवट गटारींचे बांधकाम रहिवाशांना डोकेदुखीची बनली आहे. अशातच उघड्यावर असलेल्या विद्युतवाहिन्या आणि पाणी गळतीमुळे नागरिक हैराण झाले आहे. या रस्त्याचे काम पूर्ण करून उघड्यावर असलेल्या विद्युतवाहिन्याची दुऊस्ती केली जाईल का, अशी विचारणा नागरिक करीत आहेत.
विविध विकासकामे राबवून रामतीर्थनगरचे हस्तांतर महापालिकेकडे करण्यात येत आहे. या दृष्टीने येथील गटारींचे बांधकाम आणि रस्त्याचे विकास करण्याचे काम सुरू करण्यात आले होते. विकासकामे सुरू करून चार महिने झाले तरी ही कामे अर्धवट स्थितीत आहेत. गटार खोदून बांधण्यात येत आहे. पण पूर्ण करण्याकडे कंत्राटदाराचे दुर्लक्ष झाले आहे. विशेषत: येथील जैन मंदिर परिसरातील रहिवाशांची डोकेदुखी वाढली आहे. रस्त्याचेही डांबरीकरण झाले नसल्याने वाहनधारकांना आणि रहिवाशांना ये-जा करणे मुश्कील बनले आहे. गटारीचे बांधकाम करण्यासाठी खोदाई करताना जलवाहिन्याचे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी विद्युतवाहिन्याही उघड्यावर पडल्या आहेत. जलवाहिन्याद्वारे पाणी वाया जात असून विद्युतवाहिन्यांचा धोका वाढला आहे. याबाबत महापालिका तसेच बुडाच्या अधिकाऱ्यांकडे अनेकवेळा तक्रार केली. पण येथील जलवाहिन्याच्या दुऊस्तीचे काम केले नाही. तसेच विकासकामांच्या पूर्ततेसाठीदेखील कोणतीच कारवाई केली नाही. हा परिसर बुडाच्या अखत्यारित येत असून बुडाकडून ही कामे करून घेतली जात आहेत. पण अर्धवट कामांकडे बुडा अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाले आहे. याचा फटका येथील रहिवाशांना बसत आहे. रस्त्यांचे काम तसेच गटारीचे बांधकाम तातडीने पूर्ण करून नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्याचे निवारण तातडीने करावे, अशी मागणी होत आहे.









