कारवाईसाठी गेलेल्या पोलिसावर टॅक्टर चालविला : कलबुर्गी जिल्ह्यातील घटना : एकाला अटक
प्रतिनिधी/ बेंगळूर
भीमा नदीतून बेकायदेशीर वाळ उपसा करणाऱ्या माफियांना रोखण्यासाठी गेलेल्या पोलीस हेड कॉन्स्टेबलची हत्या झाल्याची घटना कलबुर्गी जिल्ह्याच्या जेवर्गी तालुक्यातील नारायणपूरजवळ घडली आहे. मयुर भीमू चव्हाण (वय 51) असे हत्या झालेल्या हेड कॉन्स्टेबलचे नाव आहे. या प्रकरणी ट्रॅक्टरचालकाला अटक करण्यात आली आहे. आणखी एक आरोपी फरार असून त्याचा शोध जारी आहे.
घटनेविषयी अधिक माहिती अशी, मयुर चव्हाण हे गुरुवारी रात्री 10 वाजता बेकायदा वाळू वाहतूक रोखण्यासाठी सहकारी प्रमोद दोडमनी यांच्यासमवेत दुचाकीवरून गेले होते. त्यावेळी त्यांच्या दुचाकीवरून वाळू वाहतूक करणाऱ्यांनी ट्रॅक्टर चालविला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांचे सहकारी गंभीर जखमी झाले आहेत. मयुर चव्हाण हे नेलोगी पोलीस स्थानकात हेड कॉन्स्टेबल म्हणून सेवा बजावत होते. ते अफजलपूर तालुक्यातील चौडापूर तांडा येथील रहिवासी होते. या प्रकरणाची नेलोगी पोलीस स्थानकात नोंद झाली आहे. या प्रकरणी ट्रॅक्टरचालक सिद्धप्पा याला अटक करण्यात आली आहे. तर आणखी एक आरोपी सायबण्णा याचा शोध जारी आहे. आरोपींना कठोर शिक्षा केली जाईल, असे कलबुर्गी जिल्हा पोलीसप्रमुख इशा पंत यांनी दिली.
वाळू माफियांमुळे बळी गेलेल्या हेड कॉन्स्टेबल मयुर चव्हाण यांच्या कुटुंबीयांना सरकारकडून 30 लाख रुपयांची मदत दिली जाईल, असे आश्वासन दिले. जिल्ह्यातील बेकायदा वाळू वाहतूक रोखण्याचे निर्देश महसूल आणि पोलीस खात्याला दिले होते. तरी सुद्धा ही घटना घडली आहे. या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना सूचना देऊन बेकायदा वाळू वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्याची सूचना देण्यात आली आहे.
काँग्रेस सत्तेवर आल्यानंतर गुंडगिरी वाढली : आर. अशोक
वाळू माफियांना रोखण्यासाठी नेमलेल्या पथकातील कॉन्स्टेबलची हत्या झाली आहे. ही बाब निषेधार्ह आहे. कलबुर्गी जिल्हा पोलीस प्रमुखांनी अश्रू ढाळून हतबलता व्यक्त केली आहे. राज्यात अनेक दिवसांपासून गुंडगिरी थांबली होती. काँग्रेसची सत्ता आल्यानंतर गुंडगिरीने डोके वर काढले आहे. सरकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांनी संबंधितांवर त्वरित कारवाई करावी. निष्ठावंत पोलीस अधिकाऱ्यांनी हात बांधून बसल्यास सरकार चालविणे कठीण जाईल, अशी प्रतिक्रिया माजी मंत्री आर. अशोक यांनी दिली आहे.









