अध्याय पंधरावा
भगवंत उद्धवाला म्हणाले, आता क्षुद्र अशा ज्या पाच सिद्धी आहेत, त्याबद्दल तुला सांगतो. माझे भजन केले असता अंतःकरण अत्यंत शुद्ध होते. त्या शुद्ध झालेल्या अंतःकरणांत भूत, भविष्य व वर्तमान, आणि जगाचे जन्म व मरण यांचे त्रिकालज्ञान होण्याची सिद्धी प्राप्त होते. त्याच्या योगमय शरीराला अग्नी, पाणी इत्यादी कोणतीही वस्तू नष्ट करू शकत नाही. त्याला थंडी किंवा उन्हाळा, मऊ किंवा कठीण, यांची बाधा होत नाही. त्याच्या देहाला अग्नी लागला तरीसुद्धा त्याचा देह जळत नाही ! अशी ‘अद्वंद्वता’ नामक सिद्धी साधकाला प्राप्त होते. ह्याच सिद्धीच्या धारणेने ‘प्रतिष्टंभ’ सिद्धी उत्पन्न होते. त्याला अग्नीची पीडा होत नाही. थंडीच्या दिवसात मौजेने गार पाण्यात नेऊन सिद्धाला बुडविले असताही तो बाहेर निघण्याकरिता कधीच तळमळत नाही किंवा ग्रीष्मऋतूतील रखरखीत उन्हात सिद्धाला ठेवले असताही सूर्यकिरणांनी कमल जसे प्रफुल्लीत होते, त्याप्रमाणे त्याला ऊन लागले असता तो अधिकच टवटवीत होतो. सिद्धाला शस्त्राचे घाव लागले असताही तो शस्त्रापासून पीडा पावत नाही. सिद्धाला विषसुद्धा बाधक होत नाही. अग्नी, सूर्य, विष, पाणी किंवा वारा यांपैकी काहीच सिद्धाला बाधत नाही.
माझे स्वरूप शुद्ध असून अद्वैत आहे. जो योगी श्रीवत्स इत्यादी चिन्हे आणि शंख, चक्र, गदा, पद्म इत्यादी आयुधांनी विभूषित, त्याचप्रमाणे ध्वज, छत्र, चामर इत्यादींनी संपन्न अशा माझ्या अवतारांचे ध्यान करतो, तो अजिंक्मय होतो. ‘अपराज’ सिद्धीची प्राप्ती पाहिजे असेल तर माझी मूर्ति ध्यानात आणावी. जिच्या नामेकरून मोठमोठे देवादिकही हटकून जय मिळवितात. चतुर्भुज, मेघाप्रमाणे श्यामवर्ण, शंख, चक्र, गदा, पद्म, छत्र, चामरे, अबदागीर, ध्वजावर उत्तम गरुडलांछन रत्नखचित्त दांडय़ाच्या झणकाराने उत्तम पंखा हालत आहे, पायांत पैंजण वाजत आहेत आणि असंख्य शत्रु पायातील तोडराजवळ शरण आलेले आहेत अशा माझ्या मूर्तीचे ध्यान जो सदासर्वदा दक्ष राहून करेल, तो सर्वत्र विजयी होईल आणि माझ्या प्रतापाने त्याचा कोठेच पराभव होत नाही. तो केवळ माझ्याच ध्यानाने कोणाचेही साह्य न घेता एकटाच सर्वत्र विजयी होतो. एवढी ह्या नि÷sने सिद्धी प्राप्त होते. अजित अशा मला जो हृदयांत धरतो, तो सर्वत्र अजिंक्मय असतो. इतके सांगून भगवंतांनी सिद्धीच्या वर्णनाचा उपसंहार केला.
अशा प्रकारे जो माझे चिंतन करणारा पुरूष योगधारणेने माझी उपासना करतो, त्याला मी वर्णन केलेल्या सिद्धी पूर्णपणे प्राप्त होतात. मी ज्या ज्या योगधारणा सांगितल्या, त्या त्या भावनेने माझे जो भजन करील, त्याला त्या त्या सिद्धी पूर्वोक्त लक्षणांप्रमाणे साध्य होतील किंवा चित्तामध्ये अनेक स्वरूपाचे ध्यान केल्यास त्या त्या धारणेच्या अनुरोधाने त्यालाही अनेक सिद्धींची प्राप्ती होईल. अशा अनेक योगधारणांची यातायातही न करिता खरोखर ज्या एकाच धारणेने सर्व सिद्धींची प्राप्ती होते, ती धारणा मी तुला सांगतो. ज्याने आपले प्राण, मन आणि इंद्रियांवर विजय मिळवून माझ्याच स्वरूपावर धारणा केली आहे, त्याला कोणतीच सिद्धी दुर्लभ असणार नाही. पाच इंद्रियांची जी जोडी आहे, ती शमदमांच्या बळाने जिंकून वैराग्याची गुढी उभारून प्राणापानांच्या ओढीही जिंकल्या आणि विवेकाच्या बळाने वृत्तीला सावध ठेवून सर्वकाळ माझेच मनन केले की, त्या मननानेच मन जिंकले जाते. ह्याप्रमाणे साधकाने आपल्या मनांत धारणा धरून रात्रंदिवस एक माझेच ध्यान केले असता, सर्व सिद्धी त्याच्या दासी होतात. माझे भजन केले असता साधकाला, सिद्धी अवश्य प्राप्त होतात पण त्याने त्यांचा उपभोग घेणे योग्य नव्हे. कारण सिद्धीचे जे मनोरथ असतात, ते सर्व केवळ लोकरंजनाकरिता असतात. सिद्धींमध्ये कांही परमार्थ नाही. ह्या सिद्धीच्या गोष्टी ऐकून मनाला जरी मोठा उल्हास वाटला, तरी माझ्या प्राप्तीला खरोखर सिद्धी या सर्वस्वी बाधक आहेत.
क्रमशः







