कोण काय करेल याचा काही नेम राहिलेला नाही, अशी आजची स्थिती आहे. स्वत:ला देवापेक्षाही श्रेष्ठ मानणाऱ्यांची संख्या कमी नाही आणि त्यामुळे निसर्ग नियमांचे आणि त्याने घालून दिलेल्या मर्यादांचे पालन करण्याची पर्वा न करणारी माणसेही अमूप आहेत. नंतर त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतात ही बाब निराळी. पण स्वत:च्या अहंकारापोटी ते स्वत:चा जीव धोक्यात घालतात.
स्वत:ला शास्त्रज्ञ म्हणवून घेणाऱ्या एका रशियन व्यक्तीने सोशल मिडीयावर असा दावा केला आहे, की त्याने स्वत:च्या मेंदूवर स्वत:च शस्त्रक्रिया केली आहे. अशी शस्त्रक्रिया करुन त्याने आपल्या मेंदूत एक इलेक्ट्रिक रॉड बसवून घेतला आहे. या रॉड या कथित संशोधकाच्या स्वप्नांवर नियंत्रण ठेवतो, असे त्याचे म्हणणे आहे. सर्वात आश्चर्याची बाब अशी की या संशोधकाला मज्जासंस्था आणि तिच्याशी संबंधित शस्त्रक्रिया यांची काहीही माहिती नाही. तरीही त्याने इंटरनेटवरुन माहिती घेऊन ही शस्त्रक्रिया स्वत:च केली. त्याच्या या प्रतिपादनाची सत्यता तपासली जात आहे. ही शस्त्रक्रिया चांगलीच यशस्वी झाली, असे त्याचे म्हणणे. मायकेल रेडुगा असे या संशोधक म्हणवून घेणाऱ्याचे नाव आहे. त्याच्या या शस्त्रक्रियेनंतर तो रशियात चांगलाच लोकप्रिय झाला आहे. तथापि, त्याने केला तसा प्रकार कोणीही करु नये असे आवाहन अनेक वैद्यकीय तज्ञांनी केले आहे.









