अध्याय चोविसावा
प्रकृती पुरुषाच्या निर्मितीबद्दल सांख्यशास्त्राच्या आधारे बोलताना भगवंत म्हणाले, उद्धवा अगदी सुरूवातीला जेव्हा प्रलयकाल होता, तेव्हा ज्ञान आणि ज्ञेय हे सर्व मिळून एकच तत्त्व होते. नंतर जेव्हा कृतयुग आले, तेव्हाही विवेकी लोकांच्या दृष्टीने एकच आत्मतत्त्व होते. ज्याप्रमाणे निजलेल्या पुरुषाची छाया त्याच्या अंगाखालीच नाहीशी होऊन जाते, त्याप्रमाणे माया गिळून टाकून ब्रह्म पुन्हा एकटेच शिल्लक राहते. ब्रह्म एकटे असून ते परिपूर्ण आहे. अशा परिपूर्ण ब्रह्मात, मी ब्रह्म असे जे स्फुरण होते, तेच मायेचे मुख्य लक्षण होय. प्रकृती आणि पुरुष यांचे जन्मस्थान होय. पुरुषाच्यामुळे प्रकृती पूर्णपणे वाढते. पुरुषामुळे प्रकृतीलाही मोठा ताठा चढतो. ब्रह्मामध्येही मायारूपी मळ साठून तो शुद्ध ब्रह्मालाही मलिन करून सोडतो. माया ही आत्मानंदाच्या आड येते. त्याचीच माया त्याच्यावरच वाढून पुरुषाला वेडा करून सोडते. असे कर्त्याशिवायच आपोआप जे कार्यकारण आकाराला आले, त्याला कृतयुग म्हणतात. प्रकृतीपुरुषांमध्ये वेद उत्पन्न झाला. त्या वेदातील मथितार्थ हा की, ब्रह्म हे सत्य आणि माया ही मिथ्या होय. हे लक्षात घेऊन माणसाने भेदाभेद सोडला की, ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती होते. अशा प्रकारे वेदाच्या विचाराने जे अभेदभावनेचे योगी होतात, ते कृतयुगापासून कलियुगापर्यंत केव्हाही होवोत, ते ईश्वरस्वरूप असल्याने विचाराने नेहमी युगरहितच असतात. प्रकृतीच युगांच्या मालिका व चराचरादि नाना प्रकारच्या व्यक्तिना उत्पन्न करते. तसं बघायला गेलं तर परब्रह्म, सर्वव्यापक आहे. त्यात रूपाला व नामाला जागाच नाही, मनाला व बुद्धीलाही ते अगम्य आहे आणि इंद्रियांना दुर्गम आहे. ते निर्गुण व निराकार असून सत्यस्वरूप, परेच्या पलीकडचे आणि निर्विकार असे तत्त्व आहे. तरीही परब्रह्मातही मायेचे चमत्कार होतात हे अतक्मर्य आहे. ती परब्रह्मातच दृश्य आणि द्रष्टा अशा प्रकारचा विकार उत्पन्न करते, तीच प्रकृती आणि पुरुष होते आणि त्या योगाने चराचरांची वृद्धी करते. ज्याप्रमाणे स्वरूपाबरोबरच छायेची मूर्ती उत्पन्न होते, त्याप्रमाणेच ब्रह्मामध्ये मायेची स्थिती आहे. तिनंच शिव-शक्तीला पुरुष आणि प्रकृती ह्या दोन भेदांनी उत्पन्न केले आहे. ब्रह्मांडांत जे ईश्वरी स्वरूप असते, त्यालाच पिंडामध्ये (देहामध्ये) जीवाचे रूप येते. उद्धवा असा हा प्रकृतीपुरुषांचा जोडा मायेनेच दोन प्रकारचा केला आहे.
ब्रह्म अखंड आहे असे वेद म्हणतो पण मायेने त्याचे प्रकृती आणि पुरुष असे दोन भाग केले. आपण जर पूर्वेकडे तोंड करून उभे राहिलो, तर आपले प्रतिबिंब पश्चिमाभिमुख असते. त्याप्रमाणे आत्मदृष्टी स्वरूपाकडे असते पण त्याचे प्रतिबिंब असलेली जीवदृष्टी मात्र प्रपंचाकडे असते. माणसाचा आत्मा ईश्वराच्या भेटीसाठी तळमळत असतो पण त्याचवेळी त्याच्यावर त्रिगुणांचा पगडा असल्याने त्याची ओढ जगाकडे असते. त्यामुळे त्याला स्वरूपाकडे सन्मुख होता येत नाही. तो अगदी उलट बाजूलाच पाहात असतो. प्रकृती आणि पुरुष म्हणजे जीवात्मा हे दोन्ही मायेपासून तयार झालेले आहेत आणि या दोन्हीपेक्षा परमात्मस्वरूपी ब्रह्म वेगळे असते आणि ते मायेच्या अधीन नसते हे जरी माहीत असले तरी जिवात्म्याला संसारिक गोष्टीची प्रचंड ओढ असल्याने, संसारिक गोष्टीच प्रिय असतात. वरील तत्वानुसार प्रकृती आणि पुरुष ह्या दोघांची निर्मिती मायेतून झालेली असल्याने दोन्ही नष्ट होणारे आहेत. मी पुरुषही नाही आणि प्रकृतीही नाही हे उमगले की, स्वस्वरूप प्रगट होते. साधकाला आत्मज्ञान झाले की, आपले मूळ स्वरूप हे वेगळे असून आपण ब्रह्माचा अंश आहोत हे त्याच्या लक्षात येते. सुरवातीला म्हणजे सत्य युगात माणसे वेदाने सांगितल्याप्रमाणे सरळ वागत फक्त पुण्यकर्मे निरपेक्षतेने करत होती. जसजसा माणसाचा स्वार्थ वाढत गेला तसतशी माणसे गैरकृत्ये करू लागली. स्वार्थ साधण्यासाठी पुण्यकृत्ये अपेक्षेने करू लागली. त्यामुळे त्यांच्या शुभाशुभ कर्मानुसार त्यांचे प्रारब्ध ठरू लागले.
क्रमशः








