अध्याय अठ्ठाविसावा
भवबंधन ना देहाला लागू होतं ना आत्म्याला ह्या विचारावर उद्धवाने केलेला बिनतोड युक्तिवाद ऐकून भगवंत चकित झाले. ते मनात म्हणाले, माझा उद्धव आता शहाणा झाला. आपण म्हणजे हा देह नसून आत्मरूप आहोत हे त्याला पटले आहे. त्याप्रमाणे तो विचारही करू लागलाय. भगवंताना असे वाटण्याचे कारण म्हणजे, आत्म्यास भवबंध नाही हे ज्याला विवेकाने पटले, मानवले तो जरी देहात वावरत असला तरी त्याचे भवबंध हरिसंगे जुळलेले असतात. त्यामुळे तो देही असून विदेही अवस्था अनुभवत असतो. उद्धवाचे हिताचं बोलावं असं ठरवून, वर्णाश्रमापलीकडे असलेले, बांधमोक्षापासून अलिप्त असलेले, कोणतेही द्वंद्व मनात नसलेले श्रीहरि बोलू लागले. ते आता उद्धवाचा प्रत्येक मुद्यावर सविस्तर उतर देऊन त्यांचा मुद्दा उद्धवाला पटवून देणार आहेत. ते म्हणाले, उद्धवा तू म्हणतोयस ते अगदी पटण्यासारखेच आहे. तू म्हणतोयस तसं आत्मा हा निर्गुण आहे परंतु मनुष्यदेहात असताना तो स्वत:ला कर्ता समजू लागतो. त्यामुळे हा सर्व घोटाळा होतो. माणसाला म्हणजे त्याच्या आत्म्याला हा देह म्हणजेच मी असे वाटू लागले की, अनेक विचार त्याच्या मनात येऊ लागतात. सर्वप्रथम मी बारीक आहे, लठ्ठ आहे, गोरा आहे, काळा आहे असे त्याला वाटू लागते. हे देहाचे धर्म त्याला चिकटतात. मग त्याच्या इंद्रियांबद्दलचे विचार त्याच्या मनात येऊ लागतात. त्यात मी काळा आहे, मुका आहे, बहिरा आहे अशा इंद्रिय धर्माच्या विचारांचा समावेश असतो. तर मला भूक लागली, तहान लागली असे प्राण धर्माचे विचार त्याच्या मनात येऊ लागतात. काहीवेळा कामक्रोधलोभादि संभ्रम त्याच्या मनात उत्पन्न होतात. ह्याला ‘मनोधर्म’ असे म्हणतात. सत्वगुणाच्या प्रभावाखाली असतो तेव्हा तो जागृत असतो तर रजोगुणामुळे स्वप्नावस्था अनुभवतो. तमोगुणामुळे निद्रेचा अनुभव घेतो. देह निर्जीव झाला की, आपण मेलो असे त्याला वाटू लागते तसेच देहात चैतन्य आले की, आपण जन्मलो असे तो समजतो. त्यांची इंद्रिये विषयांचे सेवन करतात पण हा मीच त्यांचे सेवन करतो असे मानतो. तसेच स्वर्गनरकातील भोगांची प्राप्ती आपल्यालाच होणार आहे असे त्याला वाटते. शरीरातील प्राणाला अन्न हवे असते आणि त्याचे पचन शरीरात स्थित असलेला हुताशन करतो. ह्या सर्वाला आत्मा केवळ साक्षी असतो, तरीपण तो म्हणतो की मी अन्न खाल्ले. वर सांगितलेल्या सर्व हलचाली माझ्याच आहेत असा भ्रम त्याला होऊ लागतो. मी म्हणजे हा देह असा संचार त्याच्यात होतो. असं सर्व घडू लागलं की मिथ्या असलेला संसार चुकीच्या समजुतीमुळे तो खरा समजून त्याचा उपभोग घेऊ लागतो. अर्थात आत्म्याच्या ह्या विचारसरणीमुळे त्याला जन्ममरण, स्वर्ग नरक, पापपुण्य अशी फळे अखंड भोगावी लागतील असा भ्रम त्याला होतो. वाट चुकलेला मनुष्य ज्याप्रमाणे भ्रमिष्ट झालेला असतो तशीच आत्म्याची विचारसरणी असते. भगवंतांच्या ह्या सांगण्यावरून भ्रम झालेली व्यक्ती कसा चुकीचा विचार करू लागते, ह्याविषयी एक प्रसंग आठवला. एकदा एक कुत्रा एका बैलगाडीच्या खालून चालला होता. त्याच्या मनात असा विचार आला की, मी चालतोय म्हणून ही बैलगाडी पुढे पुढे चालली आहे. ज्याप्रमाणे कुत्र्याला भ्रम झाला होता तसाच आत्म्याला होतो. त्याच भ्रमात तो वावरत असतो. भगवंत पुढे म्हणाले, उद्धवा, मुळात संसार वृक्षाला ना शेंडा ना बुडखा पण आत्म्याला झालेल्या भ्रमामुळे त्याला हा संसार वृक्ष नुसताच समूळ वाटत नाही तर त्याला त्यांची फळेसुद्धा खुणावू लागतात. त्या फळांची त्याला इतकी चटक लागते की, अविवेकाने तो सदा त्या फळांची अपेक्षा करत बसतो. ज्याला सत्यत्व नाही त्याला लागलेली फळे आपल्याला मिळतील की नाही ह्याची तो चिंता करत असतो. आत्म्याला संसारविषयक फलाबद्दल उत्सुकताही वाटत असते पण त्याचबरोबर ती आपल्याला प्रतिकूल तर ठरणार नाहीत ना अशी भीतीही वाटत असते.








