दोडामार्ग – वार्ताहर
पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, नामदेवम हाराज की जय अशा घोषणांनी संपूर्ण पिकुळे गाव दुमदुमून गेले. येथील श्री शांतादुर्गा माध्यमिक विद्यालय मध्ये धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ मुंबईचे १५ वे ‘ नवा विद्यार्थी ‘ कुमार साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात ग्रंथदिंडी व शोभायात्रेत पिकुळे ग्रामस्थांसह अन्य संस्थेच्या अन्य शाळांमधील विद्यार्थीही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
नियोजित कार्यक्रमानुसार ग्रंथदिंडीची सुरुवात पिकुळे गावातील श्री सातेरी केळबाय मंदिर ते प्रशालेपर्यंत आयोजित करण्यात आली होती. प्रथमतः मंदिरात ग्रंथपालखीची विधिवत पुरोहित करवी संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. मिलिंद तोरसकर यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. व त्यानंतर ग्रंथदिंडीला सुरुवात करण्यात आली. भगव्या पताका, भगवे ध्वज हाती घेतलेले विद्यार्थी, शिवाय अनेकांनी यावेळी भगवे फेटे ही परिधान केले होते. यांसह साहित्यप्रेमी, शिक्षक, पिकुळेतील गावकरी या दिंडीत सहभागी झाले होते. ग्रंथदिंडीच्या सुरुवातील अनेक विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेशभूषा केली होती. डोक्यावर तुळस, हातात पंढरीच्या पांडुरंगाची मूर्ती, भगवे झेंडे हे आणि पूर्ण मंदिर परिसरात पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, नामदेव महाराज की जय अशा अनेक घोषणांनी पिकुळे गाव ह्या नवा विद्यार्थी साहित्य संमेलनात सहभागी झाला होता. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा कल्पना तोरसकर, कार्याध्यक्ष डॉ. मिलिंद तोरसकर, समन्वय समिती सचिव रश्मी तोरसकर, सहसचिव नंदकुमार नाईक, खजिनदार वैभव नाईक, कार्यकारी संपादक प्रमोद सावंत, मुख्याध्यापक स्नेहल गवस, रामचंद्र गवस, संदीप गवस, तीलकांचन गवस, मोहन गवस, यांसह अनेक संस्थेच्या अन्य शाळांमधील मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.