ईएमआय होणार कमी, कर्जदारांना थोडा दिलासा
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
एचडीएफसी बँकेने कर्जांवरील व्याजदरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या बँकेच्या कर्जधारकांना काहीसा दिलासा मिळणार आहे. त्यांचा ईएमआय कमी होणार आहे. एचडीएसी ही देशातील सर्वात मोठी खासगी बँक आहे. बँकेने फंड बेस्ड लेंडिंग मार्जिनल कॉस्ट (एमसीएलआर) कमी केली आहे. तसेच विशिष्ट कालावधीच्या कर्जांवरील व्याजदरही कमी केला आहे.
एमसीएलआर कमी झाल्यास कर्जांवरील व्याजदरही कमी होतात. त्यामुळे समान मासिक हप्त्याची (ईएमआय) रक्कमही कमी होते. याला काही प्रमाणात लाभ कर्जधारकांना मिळतो. एचडीएफसी बँकेने कर्जांवरील व्याजदरात 0.05 टक्के कपात केली आहे. याचा अर्थ 10 हजार रुपयांच्या व्याजावर 5 रुपयांची बचत होणार आहे. ज्यांनी व्यक्तिगत किंवा व्यवसायासाठी कर्जे घेतलेली आहेत, त्यांना या निर्णयाचा लाभ होणार आहे. जुन्या फ्लोटिंग दरानुसार कर्जे घेतलेल्यांचा ईएमआयही काही प्रमाणात कमी होईल. मंगळवारपासून नवे दर लागू झाले आहेत.
कोणत्या कालावधीसाठी कपात
बँकेने दिलेल्या माहितीनुसार 6 महिने, 1 वर्ष आणि 3 वर्षे या कालावधीसाठी घेतलेल्या कर्जांवरील व्याजदर आता 9.50 टक्क्यांच्या स्थानी 9.45 टक्के राहणार आहे. हे तीन कालावधी सोडून इतर कालावधींसाठीच्या कर्जांचे व्याजदर सध्या आहेत, त्याच स्थितीत राहणार आहेत. त्यामुळे या तीन कालावधीच्या कर्जफेडीचा ईएमआय काही प्रमाणात कमी होणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.









