वृत्तसंस्था /मुंबई
शिव नाडर यांनी स्थापन केलेल्या एचसीएल समूहाने दशकांपूर्वी संगणक हार्डवेअर आणि पेरिफेरल्सचा निर्माता म्हणून जागतिक स्तरावर नावलौकीक प्राप्त केला आहे. आता एचसीएल समूह भारताच्या वेगाने विकसित होत असलेल्या सेमीकंडक्टर इकोसिस्टममध्ये महत्त्वाकांक्षी योजना आखत आहे अशी माहिती आहे. काही अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एचसीएल समूह सेमीकंडक्टरसाठी असेंब्ली, टेस्टिंग, मार्किंग आणि पॅकेजिंग युनिट स्थापन करण्यासाठी केंद्राकडे प्रस्ताव सादर करण्याची योजना तयार करत आहे. या प्रकल्पासाठी 200-300 दशलक्ष डॉलर इतका खर्च येणार असल्याचा अंदाज आहे. एचसीएल मायक्रोनसारख्या कंपन्यांसोबत हातमिळवणी करेल, ज्याने गुजरातमधील साणंद येथे सेमीकंडक्टर असेंब्ली आणि टेस्ट प्रकल्पासाठी नुकतीच देशात 825 दशलक्ष डॉलर गुंतवणूकीची घोषणा केली आहे.
प्रकल्पातील गुंतवणूक 2.75 अब्ज डॉलर
प्रकल्पातील गुंतवणूक 2.75 अब्ज डॉलर इतकी असू शकते. एचसीएल समूहाच्या प्रवक्त्याने सांगितले की, एचसीएल समूह वेळोवेळी गुंतवणुकीच्या संधी प्राप्त करतो आणि त्याचे मूल्यांकन करतो. अर्थपूर्ण प्रगतीच्या आधारे आम्ही योग्य वेळी यांवर अहवाल देतो, असेही त्यांनी म्हटले आहे.









