सिद्दीकीच्या शोधासाठी गोवा पोलिस कर्नाटकात तळ ठोकून : ‘सर सलामत तो पगडी पचास’ म्हणून अमित आला शरण
पणजी : जमीन बळकाव प्रकरणातील मुख्य आरोपी सिद्दीकी उर्फ सुलेमान मोहम्मद खान याने सगळ्या गोष्टींचे व्यवस्थितपणे नियोजन करूनच कोठडीतून पलायन केले. त्याला मदत करणारा पोलिस कॉन्सेटबल अमित अशोक नाईक याचा गरज भासल्यास काटा काढण्याचाही सुलेमनचा डाव होता. कर्नाटकात पोचल्यावर आपली फसवणूक झाल्याचे अमित नाईकला कळले आणि आपल्या जीवाला आपणच धोका निर्माण करून घेतला आहे, याची त्याला जाणीव झाली. त्यामुळे ‘सर सलामत तो पगडी पचास’ असे म्हणून कॉन्स्टेबल अमित नाईक जुने हुबळी पोलिसस्थानकात स्वत:चे रक्षण करण्यासाठी शरण आला होता, असे अमित नाईक याने कबूल केले आहे.
एक कोटीवरुन तीन कोटींवर
कॉन्स्टेबल अमित नाईक हा कोठडी रक्षक म्हणून गुन्हा अन्वेषण विभागात ड्युटी बजावत होता. याच दरम्यान त्याची सुलेमानबरोबर चांगली ओळख झाली होती. तो त्याची चांगली देखरेख करीत होता. पळून जाण्याचे नियोजन करण्यासाठी सुलेमानला त्याने मोबाईलही पुरविला होता. त्यामुळे सुलेमानने सर्व नियोजन केले होते. सुरूवातीला अमित नाईक याला मदत करण्यासाठी एक कोटी ऊपये देण्याचे ठरले होते. मात्र अमितने नकार दिला. त्यानंतर त्याला दोन कोटी सांगितले तरीही अमित तयार नव्हता अखेर तीन कोटीवर आल्यानंतर तो मदत करण्यास तयार झाला.
तीन कोटींसाठी कारवारात केला
आरोपी सुलेमानची अट होती की, रक्कम कर्नाटकात पोहोचल्यानंतरच दिली जाईल. दोघेही जीए-07- एम-4609 क्रमांकाच्या दुचाकीवरून शुक्रवारी रायबंदर येथील क्राइम ब्रँचमधून कर्नाटकात जाण्यास निघाले. वाटेत पाळोले येथे थांबले. त्यानंतर सुलेमानने नाईकला कारवारला घेऊन जाण्यास सांगितले. तब्बल 3 कोटी मिळणार या आशेने अमित सुलेमानला घेऊन कारवारला गेला.
तीन कोटींसाठी कारमध्ये बसला
कारवार येथे सराईत गुन्हेगार हजरत अली कारसह तैनात होता. अमितने पैशाबाबत विचारले असता, सुलेमानने नाईकला त्याची मोटारसायकल सोडून द्यायला सांगितले. आपल्यासोबत कारमध्ये बसण्यास सांगितले. तीन कोटीची आशा डोक्यात भरल्याने तो त्यांच्याबरोबर गेला.
जीवाच्या आकांताने आला शरण
हुबळी बसस्थानकाजवळ सुलेमान त्या वाहनातून बाहेर पडला आणि गायब झाला. परत तो आलाच नाही. इथेच या योजनेला नाट्यामय वळण मिळाले. काही वेळातच हजरत अलीने अमित नाईकला गाडीतून उतरण्यास बजावले. ती विनंती नव्हती, तर एक प्रकारे अमितला धमकीच होती. त्यामुळे जीव वाचविण्यासाठी त्याला गाडीतून बाहेर पडावे लागले नंतर हजरत अलीही पसार झाला. त्यामुळे सुलेमनच्या कारस्थानात अडकलेल्या नाईकला ‘भिक नको, पण कुत्रा आवर’ म्हणत जीव वाचविणे फार महत्वाचे होते. म्हणून अमित नाईक याला जवळपास असलेल्या हुबळी पोलिसस्थानकात शरण जावे लागले.
अमितला चार दिवसांची पोलिस कोठडी
कोन्स्टेबल अमित नाईक याला गोव्यात आणून त्याची सखोल उलटतपासणी केली असता त्याने वरील सारा प्रकार उघड केला. त्याच्या विरोधात ओल्ड गोवा पोलिसस्थानकात गुन्हा नोंद करून त्याला रिमांडसाठी न्यायालयात हजर केले असता त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे.
हजरत अलीला आणले गोव्यात
फरार सुलेमानचा शोध घेण्यासाठी गोवा पोलिस कर्नाटकात ठिकठिकाणी छापे मारत आहे. गोवा पोलिसांचे खास पथक कर्नाटकात थळ ठोकून आहे. फरार आरोपी सुलेमान सिद्दीकीला आश्रय दिल्याप्रकरणी आरोपी हजारतसाब भवन्नवर उर्फ हजरत अली याला अटक करण्यात गुन्हे शाखा आणि जुने गोवा पोलिसांना यश आले आहे. काल रविवारी संध्याकाळी त्याला गोव्यात आणून न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे. जमीन हडप प्रकरणातील फरार संशयित आरोपी सिद्दिकी उर्फ सुलेमान याच्या जामीन अर्जावर 13 रोजी सुनावणी होणार होती. मात्र सुलेमान त्याच दिवशी पहटे 2.30च्या सुमारास कोठडीतून पसार झाला. सुलेमान याने 11 रोजी न्यायालयात जामीन अर्ज सादर केला होता. त्याच दिवशी विशेष चौकशी पथकाने आपले म्हणणे न्यायालयात मांडून जामीन अर्जाला विरोध दर्शविला होता. शुक्रवार, दि. 13 रोजी सुनावणीवेळी एसआयटीने पोलिस कोठडीतून संशयिताने पलायन केल्याची माहिती न्यायालयाला दिली आहे. एसआयटीने दाखल केलेल्या गुह्यांपैकी दोन गुह्यांमध्ये सिद्दीकीला जामीन मंजूर झाला होता. सुलेमान खान याने म्हापसा येथील प्रथमवर्ग न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला आहे. अॅड. अमित पालेकर, अॅड. राकेश रवी नाईक व अॅड. सलमान पठाण यांनी सिद्दिकीच्यावतीने न्यायालयात हा अर्ज सादर केलेला आहे. विशेष चौकशी पथकाने संशयित पोलीस कोठडीतून फरार झाल्याची माहिती न्यायालयात दिली आहे. दि. 16 रोजी जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे.
अमितचा नाईकचा पोलिस कोठडीत आत्मघाताचा प्रयत्न
जमीन हडप प्रकरणातील मुख्य आरोपी सुलेमान उर्फ सिद्दीकी खान याला कोठडीतून पळून जाण्यास मदत करणारा आयआरबी पोलिस कॉन्स्टेबल अमित नाईक याने फिनाईल प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना काल रविवारी सकाळी 8 च्या सुमारास जुने गोवे पोलिसांच्या रायबंदर पोलिस चौकीमध्ये घडली. त्याच्यावर सध्या गोमेकॉत उपचार सुरू आहेत. अमित नाईक या पोलिसाच्या सहाय्याने पसार होत सिद्दीकीने गोवा पोलिस यंत्रणेला आव्हान दिले आहे. अमित नाईक यानेच त्याला रायबंदर येथील गुन्हे अन्वेषण विभागाच्या कोठडीतून बाहेर काढून स्वत:च्या दुचाकीवरुन कर्नाटकात पोहोचविले होते. सिद्दीकीने त्याला या कामासाठी तीन कोटी रुपये देण्याचे आमिष दाखविले होते.
मात्र त्याला तीन कोटी मिळाल्याच नाहीत, उलट त्याच्या जीवाला धोका निर्माण झाला. तो 13 रोजी रात्री कर्नाटकातील हुबळी पोलिसांना शरण आला होता. त्यानंतर शनिवारी 14 रोजी जुने गोवे पोलिसांनी त्याला अटक केली. अमित नाईकला अटक केल्यानंतर पोलिसांनी रायबंदर पोलिस चौकीतील कोठडीत ठेवले होते. रविवारी सकाळी संशयिताने स्वच्छतागृहात जाण्याचा बहाणा केला. तिथे साफ-सफाईचे काम करणाऱ्या महिलेच्या हातातून फिनाईलची बाटली हिसकाऊन फिनाईल प्राशन केले. हा प्रकार समजताच पोलिसांनी त्याला गोमेकॉत दाखल केले. तिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळाल्यावर उत्तर गोवा पोलिस अधीक्षक अक्षत कौशल व उपअधीक्षक सुदेश नाईक यांनी गोमेकॉत जाऊऩ संशयिताची चौकशी केली.









