वृत्तसंस्था/ अॅडलेड
येथे 6 डिसेंबरपासून खेळविल्या जाणाऱ्या दिवस-रात्रीच्या भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हॅझलवूड दुखापतीमुळे खेळू शकणार नसल्याची माहिती क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या प्रवक्त्याने शनिवारी दिली.
यजमान ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात बॉर्डर-गावस्कर चषकासाठीच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताने पर्थची पहिली कसोटी जिंकून यापूर्वी आघाडी मिळवली आहे. हॅझलवूडच्या डाव्या पायाला ही दुखापत झाली असून तो दुसऱ्या कसोटीत खेळू शकणार नाही. मात्र या मालिकेतील उर्वरित तीन कसोटी सामन्यात तो निश्चित खेळेल, असे भाकित करण्यात आले आहे. अॅडलेडच्या दुसऱ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियन संघामध्ये वेगवान गोलंदाज सिन अॅबॉट आणि ब्रेंडेन डॉगेट यांचा समावेश करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे या दुसऱ्या कसोटीसाठी घोषित करण्यात आलेल्या ऑस्ट्रेलियन संघामध्ये अष्टपैलू वेबस्टर या नव्या चेहऱ्याचा समावेश करण्यात आला आहे. अंतिम 11 खेळाडूंमध्ये हॅझलवूच्या जागी बोलँडला संधी दिली जाईल, असा अंदाज आहे. अॅडलेडच्या दुसऱ्या कसोटीत गुलाबी रंगाचा चेंडू वापरला जाणार आहे. 2020-21 च्या मालिकेमध्ये 33 वर्षीय हॅझलवूडने दिवस-रात्रीच्या कसोटी सामन्यात आपल्या 5 षटकात 8 धावांच्या मोबदल्यात 5 गडी बाद केले होते. आणि भारताला ऑस्ट्रेलियाने 36 धावांत गुंडाळले होते.









