ग्रीन व स्टार्क तिसऱया कसोटीसाठी उपलब्ध
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताविरुद्धच्या मालिकेत पहिल्या दोन्ही कसोटी गमविल्यानंतर पिछाडीवर पडलेल्या ऑस्ट्रेलियाला आणखी एक धक्का बसला असून त्यांचा प्रमुख वेगवान गोलंदाज जोश हॅझलवुड टाचदुखीमुळे उर्वरित मालिकेत खेळू शकणार नसल्याचे सांगण्यात आले. मात्र कॅमेरॉन ग्रीन व स्टार्क फिट झाले असल्याचे सांगण्यात आले.
ऑस्ट्रेलियन संघाचे प्रमुख प्रशिक्षक अँड्रय़ू मॅकडोनाल्ड यांनी हॅझलवुड मायदेशी परतणार असल्याचे सांगितले. पहिल्या दोन सामन्यातही त्याला याच दुखापतीमुळे खेळता आले नव्हते. तो आता मायदेशी जाऊन त्यावर उपचार व रिहॅबिलिटेशन करणार आहे. पहिल्या दोन सामन्यात त्याची उणीव ऑस्ट्रेलियाला प्रकर्षाने जाणवली होती. ऑस्ट्रेलियाला दिलासा देणारे वृत्त म्हणजे त्यांचा आणखी एक वेगवान गोलंदाज कॅमेरॉन ग्रीनचे फिट हेणे. या स्टार अष्टपैलूला फिट घोषित करण्यात आले असल्याने तो तिसऱया कसोटीसाठी उपलब्ध झाला आहे. याशिवाय दुसरा जलद गोलंदाज मायकेल स्टार्कही या कसोटीत खेळणार आहे.

पूर्ण फिटनेस मिळविण्यासाठी गेले काही आठवडे हॅझलवुड संघर्ष करीत होता. पण तो पूर्ण फिट झाला नसल्याचे दिसून आले. तो आता सिडनीत रिहॅब करणार आहे. स्टार्क व ग्रीन पूर्ण फिट झाल्याने मालिकेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या आशा बळावल्या आहेत. प्रशिक्षक मॅकडोनाल्ड यांनी ग्रीन शंभर टक्के फिट असल्याचे जाहीर केले असून स्टार्कही पुढील कसोटी खेळण्याच्या मार्गावर असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

नागपूर कसोटीत पदार्पण केलेल्या स्पिनर टॉम मर्फीने त्या सामन्यात 7 बळी मिळविले. पण त्याला स्नायुदुखीचा त्रास सुरू आहे. मात्र तो वेळेत पूर्ण बरा होईल, अशी आशा प्रशिक्षकांनी व्यक्त केली आहे. त्याची दुखापत किरकोळ असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दुसऱया कसोटीत जखमी झालेल्या डेव्हिड वॉर्नरच्या फिटनेसवरही लक्ष ठेवण्यात आले असून त्याच्या डाव्या हाताच्या कोपराला स्ट्रेस फ्रॅक्चर झाले आहे. दुसऱया कसोटीआधी मायदेशी परतलेला लेगस्पिनर मिचेल स्वेप्सनही पुन्हा भारतात येणार असल्याचे सांगण्यात आले.









