शेतकऱ्यांना जवळपास 50 हजाराचा आर्थिक फटका
वार्ताहर /उचगाव
उचगाव-अनगोळ गल्ली येथील शेतकऱ्यांनी ठेवलेल्या गवतगंज्यांना आग लागून दोन गवतगंज्या आगीमध्ये जळून भस्मसात झाल्या. यामध्ये या शेतकऱ्यांना जवळपास 50 हजाराचा मोठा आर्थिक फटका बसला आहे. य् ाा घटनेची अधिक माहिती अशी की, अनगोळ गल्ली येथील मनोहर नेसरकर व ज्योतिबा नेसरकर यांनी आपल्या जनावरांसाठी म्हणून गवतगंज्या ठेवलेल्या होत्या. रविवार दि. 7 मे रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमाराला या गवतगंज्यांना आकस्मात आग लागली. आग लागताच जवळपासच्या नागरिकांनी घटनास्थळी येत ही आग आटोक्यात आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. मात्र दोन्ही गवतगंज्या आगीमध्ये भस्म झाल्या. संपूर्ण पावसाळी हंगामामध्ये जनावरांच्या चाऱ्याची व्यवस्था करण्यात आलेली होती. सदर चारा आगीत भस्म झाल्याने जनावरांचे पावसाळ्यात कसे पोषण करावे, याची चिंता या शेतकऱ्यांना लागून राहिली आहे. यासाठी शासनाने या गरीब शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य मिळवून द्यावे, अशी मागणी नागरिकांतून करण्यात येत आहे.









