स्मार्ट सिटीमधील फुटपाथ-सायकल ट्रकचा दुरुपयोग, मनपाचे दुर्लक्ष : विविध व्यापाऱयांनी रस्त्यावरच अतिक्रमण करून थाटले व्यवसाय
प्रतिनिधी / बेळगाव
फुटपाथ आणि सायकलस्वारांसाठी सायकल ट्रकची तरतूद स्मार्ट रस्त्याशेजारी करण्यात आली आहे. मात्र बहुतांश सायकल ट्रक आणि फुटपाथ फेरीवाल्यांनी व्यापले आहेत. काही ठिकाणी सायकल ट्रकचा वापर दुचाकी आणि चारचाकी वाहने पार्क करण्यासाठी केला जात आहे. त्यामुळे सायकल टॅक व फुटपाथ नेमके कशासाठी? असा मुद्दा उपस्थित झाला आहे.

शहर आणि उपनगरांतील नागरिकांना रस्त्यावरून ये-जा करताना कोणतीही अडचण भासू नये, याकरिता स्मार्ट सिटी योजनेंतर्गत फुटपाथ व सायकल टॅक निर्माण करण्यात आले आहेत. शहरातील प्रमुख रस्त्यांवर वाहनांची वर्दळ मोठय़ा प्रमाणात असते. त्यामुळे पादचाऱयांना ये-जा करताना खूपच कठीण बनले आहे. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत रस्त्याचे काँक्रिटीकरण केल्यानंतर गुळगुळीत रस्त्यांवर वाहने भरधाव चालविली जातात. त्यामुळे पादचारी आणि सायकलस्वारांना मार्ग काढताना अपघाताचा धोका आहे. याचा विचार करून स्मार्ट सिटी योजनेमधून रस्त्यांचा विकास करताना स्मार्ट रस्त्यांवर फुटपाथ आणि सायकल ट्रक निर्माण करण्यात आले आहेत. विशेषतः राष्ट्रीय महामार्गापासून सुरू होणाऱया केएलई रुग्णालयासमोरील रस्त्यापासून पिरनवाडी क्रॉसपर्यंतच्या खानापूर रोडसह, क्लब रोड, संगोळ्ळी रायण्णा रोड, जुना धारवाड रोड, काँग्रेस रोड, वडगाव रोड तसेच महांतेशनगरमधील विविध रस्ते, एपीएमसी रोड, हनुमाननगर परिसरातील रस्त्याशेजारी सायकल ट्रक आणि फुटपाथ निर्माण करण्यात आले आहेत. पण सर्वच रस्त्यांवर विविध व्यापाऱयांनी अतिक्रमण करून व्यवसाय थाटले आहेत. त्यामुळे संपूर्ण फुटपाथचा वापर व्यवसायाकरिता केला जात आहे. तर सायकल ट्रकवर दुचाकी आणि चारचाकी वाहने पार्क केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. काही ठिकाणी फळ विपेत्यांनी स्टॉल्स थाटल्याने पादचाऱयांना ये-जा करण्यास रस्ता शिल्लक राहिला नाही. सायकल ट्रकवर चारचाकी वाहनांमुळे सायकल चालक आणि पादचाऱयांना मुख्य रस्त्यावरून ये-जा करावी लागत आहे.
सायकल ट्रक खुले करण्याची मागणी…
फुटपाथवरील फळविपेते तसेच अन्य व्यापाऱयांना हटविण्याची कारवाई मनपाकडून राबविण्यात येते. पण ही कारवाई केवळ एका दिवसापुरती असते. कारवाईनंतर दुसऱया दिवशी व्यावसायिक पुन्हा फुटपाथवर ठाण मांडून बसतात. त्यामुळे फुटपाथ फळविपेत्यांसाठी आणि सायकल
ट्रक पार्किंगसाठी निर्माण करण्यात आले आहे का? असा मुद्दा उपस्थित झाला आहे. याबाबत ठोस कारवाई राबवून पादचाऱयांसाठी आणि सायकलस्वारांसाठी सायकल ट्रक खुले करावे, अशी मागणी होत आहे.









