2 कोटी 62 लाख रुपये जप्त, 8 जणांना अटक, एटीएस, प्राप्तिकर विभागासह पोलिसांची संयुक्त कारवाई
नोएडा / वृत्तसंस्था
नोएडा पोलिसांनी 2 कोटी 50 लाख रुपये इतकी हवालाची रोकड जप्त केली आहे. याप्रकरणी 8 जणांना अटक करण्यात आली असून दिल्लीतून तीन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. दिल्लीत छापा टाकून 96 लाखांची रोकड जप्त करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. चौकशीअंती सूरतमधील व्यावसायिकाकडून आणलेले पैसे हवालाद्वारे नोएडातील व्यावसायिकापर्यंत पोहोचविले जात असल्याचे स्पष्ट झाल्याने हे आंतरराज्य रॅकेट असल्याचे स्पष्ट झाले आहे.
हवाला रकमेसंबंधी नोएडा पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली आहे. नोएडा पोलिसांची अनेक पथके हवालाशी संबंधित इतर लोकांना अटक करण्यात आणि त्यांच्या नेटवर्कशी जोडलेल्या लोकांच्या शोधात गुंतलेली आहेत. नोएडातील हवाला व्यापाऱयांवर छापे टाकण्यात आले आहेत. तसेच नोएडा पोलिसांनी दिल्ली पोलिसांसह चांदनी चौकातील हवाला व्यापाऱयांवर छापे टाकले होते. नोएडामधून 1.67 लाख रुपये आणि दिल्लीत 95 लाख रुपये जप्त करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. एकूण 2 कोटी 62 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. हा सर्व पैसा गुजरातमधील सुरत येथून आला होता. गुजरात, मुंबई आणि दिल्लीतील उद्योजकांची नावेही या सर्व व्यवहारामध्ये पुढे आली आहेत. हवाला रॅकेटमधील काहींना अटकही करण्यात आली आहे. नोएडामध्ये ज्या कारमधून रोकड जप्त करण्यात आली, त्या कारच्या मालकाची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.









