पत्नीने केला पतीवर विषयप्रयोग : पती अत्यवस्थ, दोन मुक्या जीवांचा हकनाक बळी, सौंदत्ती तालुक्यातील घटना
बेळगाव : उप्पीटातून विष घालून पत्नीने पतीचा खून करण्याचा प्रयत्न केला. आठ दिवसांपूर्वी सौंदत्ती तालुक्यातील गोरबाळ येथे ही घटना घडली असून विषारी उप्पीट खाऊन अत्यवस्थ झालेल्या पतीला हुबळी येथील किम्स इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. पती बचावला तरी विषारी उप्पीटाने दोन मुक्या जिवांचा बळी गेला आहे. मालकाने सोडलेले उप्पीट खाऊन एक मांजर व पाळीव कुत्र्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली असून यासंबंधी सौंदत्ती पोलीस स्थानकात दोघा जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. निंगाप्पा फकिराप्पा हमानी (वय 35) असे अत्यवस्थ झालेल्या पतीचे नाव आहे. निंगाप्पाचे वडील फकिराप्पा यल्लाप्पा हमानी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्याची पत्नी सावाक्का (वय 32) व तिचा भाऊ फकिराप्पा लक्ष्मण सिंदोगी (वय 30) या दोघा जणांवर भादंवि 307, 109, सहकलम 34 अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी शुक्रवारी सायंकाळी यासंबंधी माहिती दिली आहे. 11 ऑगस्ट रोजी ही घटना घडली असून सावाक्काने आपल्या पतीसाठी उप्पीट बनविले होते. ते उप्पीट खाल्ल्यानंतर पती निंगाप्पा अत्यवस्थ झाला. सुरुवातीला त्याच्यावर स्थानिक इस्पितळात उपचार करण्यात आले. पुढील उपचारासाठी त्याला हुबळी येथील किम्समध्ये हलविण्यात आले. वैद्यकीय तपासणीअंती विषबाधेने निंगाप्पा अत्यवस्थ झाल्याचे सामोरे आले. त्यानंतर पोलिसांनी निंगाप्पाने विषप्राशन केले आहे का? यासंबंधी विचारणा केली. मात्र, त्याचे उत्तर ‘नाही’ असे आले. विष प्याले नाही तर तो अत्यवस्थ कसा झाला? याचा तपास करताना विषारी उप्पीटाचे प्रकरण उघडकीस आले.
दोन एकर शेतासाठी?
उप्पीटमधून विषप्रयोग करून पत्नीने पतीचा खून करण्याचा प्रयत्न नेमका कशासाठी केला? या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचे काम पोलिसांनी हाती घेतले असता दोन एकर शेत बळकाविण्यासाठी आपल्या भावाने दिलेला सल्ला ऐकून सावाक्काने पतीवर विषप्रयोग केल्याचे उघडकीस आले आहे. सौंदत्तीचे पोलीस उपनिरीक्षक आनंद क्यारकट्टी पुढील तपास करीत आहेत.









