पंचनामे सुरु, आठवड्यात भरात होणार पूर्ण; भातपिक कुजले, नाचना पिकाचे नुकसान; भुईमूगाला जमिनीतच आले अंकूर; ज्वारीची कणसे झाली खराब
कृष्णात चौगले कोल्हापूर
ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून अखंडपणे सुरु असलेल्या परतीच्या पावसामुळे जिह्यातील 987 हेक्रटमधील खरीप पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. जोरदार पावसाच्या तडाख्यामुळे कापणीस आलेले भात पिक भुईसपाट झाले असून भुईमूग पिकाच्या काढणीअभावी जमिनीतच अंकूर फुटले आहेत. नाचना आणि ज्वारी पिकाचेही मोठय़ा प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. आणखी आठ दिवस पावसामध्ये सातत्य राहिल्यास हातातोडांशी आलेले खरीप पिक पूर्णपणे वाया जाण्याची शक्यता आहे. कृषी विभागाकडून नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे सुरु असून येत्या आठवडय़ाभरात पूर्ण होतील. पंचनामे पूर्ण झाल्यानंतर जिल्हाधिकाऱयांच्या सहीने नुकसानीचा अहवाल शासनाकडे पाठवला जाणार आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणखी सुमारे आठवडाभर पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऐन दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बळीराजाच्या चेहऱ्यावर चिंतेचे सावट पसरले आहेत. यंदा जूनच्या सुरुवातीपासून चांगला पाऊस पडेल असा अंदाज वेधशाळेकडून वर्तवला होता. तसेच विविध खासगी वेधशाळांनीही या अंदाजाला दुजोरा दिला होता. पण हे सर्वच अंदाज फोल ठरल्यामुळे शेतकऱयांचे खरीप हंगामाचे नियोजन कोलमडले होते. यावर्षी सुमारे पंधरा दिवस उशीरा मोसमी पावसाला सुरूवात झाली. त्यामुळे अनेक ठिकाणी धुळवाफ पेरणी केलेल्या खरीप पिकांची दुबार पेरणी करावी लागणार की काय अशी स्थिती निर्माण झाली होती. पण मृग नक्षत्राच्या उत्तरार्धात जोरदार पाऊस सुरु झाला. त्यामुळे पेरणी झालेल्या पिकांची चांगली उगवण झाली. त्यानंतर जुलै महिन्याच्या सुरुवातीस पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिकांची वाढ खुंटली होती. यावेळी भात व नाचना रोप लावणीची कामेही लांबणीवर पडली होती. पण जुलैच्या उत्तरार्धात जोरदार पाऊस झाल्यामुळे खरीप पिकांची चांगली वाढ झाली. त्यानंतर ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाने पूर्णपणे दडी मारल्यामुळे खरीप पिके संकटात सापडली होती. यावेळी सोयाबिन, भुईमुग, भात, नाचना आदी माळरानावरील पिकांना जोरदार पावसाची गरज होती. त्यानंतर सुमारे 10 ते 15 दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पाऊस सुरु झाला. पण गेल्या 15 ते 20 दिवसांपासून सुरु असलेल्या परतीच्या पावसामुळे पुन्हा काढणीस आलेली खरीप पिके धोक्यात सापडली आहेत. या बेभरवशाच्या पावसामुळे शेतकरी चोहो बाजूंनी संकटात सापडला आहे.
परतीचा पाऊस परतणार कधी ?
कोल्हापूर जिह्यामध्ये खरीप हंगामामध्ये भात, नागली, ज्वारी, भुईमूग व सोयाबिन या प्रमुख पिकांची पेरणी झाली आहे. तर उडीद,मूग, मका, तूर, तीळ आदी दुय्यम पिकांची पेरणी झाली. यामध्ये जिह्यात 2 लाख 4 हजार 225 हेक्टर क्षेत्रावर मुख्य आणि दुय्यम पिकांची पेरणी झाली असून चांगली वाढ झाली आहे. सद्यस्थितीत सर्व पिके काढणीस आली आहेत. पण पावसामुळे काढणी पूर्णपणे खोळंबली आहे. जमिनीमध्ये पाणी साचल्यामुळे सोयाबिन, भुईमूगासह भात पिक कुजले आहे. पक्व भुईमूगाच्या शेंगांना जमिनीतच अंकुर फुटले आहेत. त्यामुळे पाऊस कधी परतणार याकडे जिह्यातील बळीराजाचे डोळे लागले आहेत.
पाऊस थांबल्यानंतरच शेतकऱयांची दिवाळी होणार साजरी
जिह्यात विजांच्या कडकडाटासह दररोज पावसाचे थैमान सुरु आहे. ढगफुटीसदृष्य पडणाऱया या पावसामुळे संपूर्ण शिवारात पाणीच पाणी झाले आहे. त्यामुळे खरीप काढणीसह शेतातील अन्य कामे पूर्णपणे ठप्प झाली आहेत. हवामान खात्याच्या अंदाजानुसार आणखी सहा ते सात दिवस पाऊस पडणार आहे. परिणामी दिवाळीनंतरच खरीप काढणीच्या सुगीला वेग येणार असून घरात धान्याची रास लागणार आहे. हीच शेतकऱयांसाठी खरी दिवाळी असेल.
आठवडय़ाभरात पंचनामे होणार पूर्ण
ऑक्टोबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे जिह्यातील 987 हेक्टरमधील खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. या पिकांचे पंचनामे सुरु असून आठवडय़ाभरात पूर्ण होतील. यामध्ये भात, सोयाबिन, भुईमूग आणि भाजीपाला पिकांना सर्वाधिक फटका बसला आहे. पंचनामे पूर्ण झाल्यानंतर त्याचा भरपाईच्या मागणीसाठी त्याचा अहवाल शासनाकडे पाठवला जाणार आहे.
जालिंदर पांगरे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी









