भूस्खलनामुळे एकाचा मृत्यू : तिघे जखमी : 80 हून अधिक रस्ते बंद
वृत्तसंस्था/ शिमला
हिमाचल प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये रविवारी रात्री उशिरा मुसळधार पाऊस झाला. यानंतर अनेक ठिकाणी भूस्खलन झाल्याने दरडी कोसळल्या. चंदीगड-शिमला राष्ट्रीय महामार्ग-5 वर डोंगर कोसळल्याने एकाचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली. तसेच अन्य 3 जण जखमी झाले. याशिवाय किन्नौर जिल्ह्यातही ढगफुटी झाल्यामुळे परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे. लोकांच्या घरात पाणी शिरले आहे. सध्या राज्यात विविध ठिकाणी दरडी कोसळल्याने 80 हून अधिक रस्ते बंद आहेत. परिणामत: अनेक गावांशी संपर्क मर्यादित झाला आहे. काही भागातील जनजीवन ठप्प झाले आहे.
दुसरीकडे, उत्तर प्रदेशातील ललितपूरमध्ये पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. राजघाट धरणाचे 8 दरवाजे तर मटाटीला धरणाचे 20 दरवाजे उघडण्यात आल्यामुळे बेटवा नदीला पूर आला आहे. नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्याचवेळी मध्यप्रदेशातही मुसळधार पाऊस सुरू आहे. आतापर्यंत राज्यात सरासरीपेक्षा 7 टक्के जास्त पाऊस झाला आहे. येथे नर्मदा नदीला उधाण आले आहे. कोलार, बर्गी, सातपुडा यासह अनेक धरणांचे दरवाजे उघडून पाणी सोडले जात आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने देशभरातील 15 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा जारी केला आहे.