ताप आल्यावर झोपच हरपली
चांगली प्रकृती आणि दीर्घायुष्यासाठी उत्तम झोप अत्यंत गरजेची असते असे मानले जाते. जर कुणी दोन-तीन दिवस झोपला नसेल तर त्याची अवस्था अत्यंत वाईट असते. परंतु प्रत्येक गोष्टीला अपवाद हा असतोच. व्हिएतनामच्या एका व्यक्तीने आपण 61 वर्षांपासून झोपलो नसल्याचा दावा केला आहे.
व्हिएतनाममध्ये राहणाऱया या व्यक्तीचे नाव थाई एनजोक आहे. लहानपणी एकेरात्री ताप आला होता, त्या रात्रीनंतर मी कधीच झोपू शकलो नाही असे 80 वर्षीय एनजोक यांनी म्हटले आहे. इतरांप्रमाणे निवांत झोप घेता यावी अशी त्यांची इच्छा आहे, परंतु झोपच येत नसल्याने ते हतबल झाले आहेत.

सुमारे 1962 पासून त्यांची झोप कायमस्वरुपी उडाली आहे. दशकांपासून त्यांची पत्नी, मुले, मित्र, शेजारी कुणीच त्यांना झोपताना पाहिलेले नाही. अनेक लोकांनी त्यांचा हा दावा पडताळून पाहण्याचा प्रयत्न केला, यात ते खरे बोलत असल्याचेच सिद्ध झाले.
डॉक्टर या प्रकाराला इनसोम्निया म्हणजेच निद्रानाश म्हणतात. या आजारामुळे पीडित व्यक्तीच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर प्रतिकूल प्रभाव पडतो. परंतु एनजोक यांच्या आरोग्यावर याचा कुठलाच विशेष प्रभाव दिसून आलेला नाही. एनजोक हे आजही तंदुरुस्त आहेत. सकाळी अनेक तास फिरून आल्यावर ते कष्टाचे काम करतात. तसेच चांगला आहार घेत असतात. ग्रीन टी पिण्यासोबत वाइनचे शौकिन असलेल्या एनजोक यांना केवळ इतरांप्रमाणे झोपता येत नसल्याचीच खंत आहे.
कितीही काम केले तरीही अन्य लोकांच्या तुलनेत मला कमी थकवा जाणवतो. अधिक मद्यपान केले तर कुठे 1-2 तासांसाठी बेडवर पहुडतो, परंतु तरीही झोप येत नसल्याचे एनजोक यांनी एका मुलाखतीत सांगितले आहे.









